संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेला तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली भेटीत अधिकृत कार्यक्रमांबरोबच राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. येत्या ८ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर महत्वाची सुनावणी असल्याने घटनापीठाचा निर्णय झाला तर सुनावणीस वेळ लागणं गृहित धरून विस्तारावर निर्णय होण्याची शक्यता आहे. या भेटीत सर्व शक्यतांवर विचार करुन विस्ताराचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे.
शिंदे-फडणवीस दिल्लीत नक्की कशासाठी ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. ‘आझादी का अमृत महोत्सवा’निमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला ते हजेरी लावणार आहेत. यंदा देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच रविवारी नीती आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीलाही देशभरातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार ?
दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली होती, त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक एकटेच दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी राज्यात रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असल्याने आता तरी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची समस्या
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत नेमकं काय होतं, हाही एक मुद्दा मंत्रिमंडळ विस्तारात अडथळा आणत आहे. शिवसेनेच्या मागणीप्रमाणे एकनाथ शिंदेंसह १६ बंडखोर आमदार अपात्र ठरले, तर सरकारच कोसळेल. त्यामुळे वाट पाहिली जात आहे, पण आता घटनापीठाचा मुद्दा पुढे आला आहे. जर घटनापीठ स्थापन झाल्यानंतर सुनावणी लांबण्याची शक्यता निर्माण झाली, तर विस्तार लवकरही होऊ शकेल असे बोलले जात आहे.