संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवली पश्चिमेकडील प्रभागातील गोरगरीबांची दिवाळी गोड व्हावी याकरिता कोपर येथील शिवसेना शाखेने आपली १२ वर्षाची परंपरा अखंडरित्या कायम ठेवली आहे. हजारो लाभार्थींना दिवाळीचे पदार्थ तयार करण्यासाठी विविध जिन्नस असलेले किट मोफत वाटण्यात येत आहेत. माजी नगरसेवक आणि माजी परिवहन सभापती संजय पावशे, अपर्णा पावशे यांच्या हस्ते किट वाटपाचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला.
गेली १२ वर्ष शिवसेना कोपर शाखा आणि ‘कै.लक्ष्मण विष्णू पावशे प्रतिष्ठान’ च्या वतीने दोन वर्षांच्या कोरोनाच्या महाभयंकर संसर्गाच्या काळानंतर डोंबिवली येथील शिवसेना कोपर शाखेच्या वतीने दहिहंडी, गणेशोत्सव, दिवाळी इत्यादी सणांना विविध वस्तूंचे अन्यथा अन्नधान्य लाभार्थींना वाटण्यात येते. हिंदूह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारणाचे वैचारिक धोरण आम्ही राबवित आहोत.
धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डाॅ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेच्या वतीने विविध सांस्कृतिक, सामाजिक, मदतीचे, विविध प्रमाणपत्रे वाटप करण्यात येते. दोन वर्षांच्या कोरोना नंतरची दिवाळी आनंदाची आणि समस्त गोरगरीब जनतेला गोड जावी याकरिता हजारो लाभार्थींना मोफत किट वाटण्यात येत आहेत. चार दिवस हा उपक्रम सुरु असेल असे संजय पावशे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.