मिरा भाईंदर: काशिमिरा ते घोडबंदर महामार्ग परिसरात अवैध वाहतूकीचा सुळसुळाट झाला असल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचा माफियाराज निर्माण झाला आहे.
गेली कित्येक वर्ष घोडबंदर वरसावे येथील फाऊंटन नाक्यावर मारुती इको गाड्यांच्या माध्यमातून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. सदर बाबतीत स्थानिक घोडबंदर वासियांना रोजगार नाकारत, खानिवडे विरार चारोटी मनोर येथील, कल्पेश भोईर उर्फ कुमार भोईर नावाच्या व्यक्ती कडून दमदाटी केली जात आहे. त्यांच्या मार्फत शेकडो गाड्या वापी सुरतच्या दिशेने अवैध प्रवासी वाहतुकीसाठी दररोज चालवल्या जात आहेत.
या संदर्भात २०२० पासून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सातत्याने तक्रारी करून त्यांचा पाठपुरावा करीत असून, घोडबंदर येथील स्थानिक तरुणांना कायदेशीररीत्या प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करता यावा यासाठी प्रयत्न करीत आहोत. मात्र कल्पेश भोईर व त्याचे साथीदार बाहेरून मिरा भाईंदर शहरात येऊन स्थानिक तरुणांना दमदाटी करून अनधिकृत रित्या सदर अवैध वाहतूक करीत असतात.
या बाबत युवक काँग्रेस तर्फे गेली दीड वर्षांपासून काशिमीरा येथील वाहतूक पोलीस विभागाशी पत्रव्यवहार केला असून यावर तोडगा काढण्यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे.
घोडबंदर मधील तरुण ज्यावेळी वाहतुकीच्या व्यवसाय करण्यास पुढे येतात तेव्हा कल्पेश भोईर व त्याच्या गटातील गाडी चालक गुंडांकडून घोडबंदरच्या तरुणांवर हायवेच्या एकांत जागेत गाड्या थांबवून मारहाण करणे, त्यांच्या गाड्यांची तोडफोड करणे व आता तर नाक्यावर येऊन ह्या गरीब तरुणांच्या आई बहिणींना सुद्धा धमक्या देणे असे प्रकार सातत्याने सुरू झाले आहेत.
गेल्या २८ मार्च रोजी सकाळी अशाच प्रकारची एक घटना घोडबंदर येथे राहुल जगळपुरे यांच्या सोबत घडली. कल्पेश भोईर याने फाऊंटन नाक्यावर येऊन त्यास धमकावले, त्याचे व त्याच्या आईचे पुढील महिन्याभरात कसे बरेवाईट करतो याबद्दल भरचौकात धमकी दिली.
या घडलेल्या प्रकारावर राहुल जगळपुरे यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर काशिमीरा वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी घोडबंदर मधील तरुणांना पोलीस ठाण्यात बोलावून उलट राहुल याने गुन्हा दाखलच का केला? असा उलट सवाल केला गेला. यावरून वाहतूक पोलिस देखील अशा प्रकारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गुंडांना सहकार्य करीत की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
घोडबंदर येथील वर्सोवा पुलाजवळ या अवैध वाहतुकीचा मुख्य नाका तयार झाला आहे. त्याच प्रमाणे मीरारोड पूर्वेकडील काशिमिरा नाका, दहिसर चेकनाका, मीरारोड येथील शिवार गार्डन, गोल्डन नेस्ट नाका या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्याची दादागिरी खूपच वाढली असून त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या विषयाचे गांभीर्य ओळखून मिरा भाईंदर शहरातील युवक काँग्रेस शिष्टमंडळाने पोलीस उपयुक्त अमित काळे यांची भेट घेतली. पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी तातडीने वाहतूक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांना अवैध वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्याच बरोबर काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांना संबंधित आरोपींवर चॅप्टर केस तातडीने दाखल करण्याचे देखील आदेश दिले. या विषयाला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे अशी भूमिका युवक काँग्रेस ने यावेळी घेतली. या शिष्टमंडळात, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रतिनिधी, दीप काकडे नवनियुक्त मिरा भाईंदर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धेश राणे, युवक ब्लॉकचे अध्यक्ष अश्फाक शेख व घोडबंदर गावातील तरुण व स्थानिक सहकारी सहभागी होते.
असे असले तरी घोडबंदर परिसरातील अवैध प्रवासी वाहतूक अद्याप ही थांबली नसल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गुंडांची दहशत वाढली असून त्यामुळे परिसरात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
“घोडबंदर फाऊंटन नाक्यावरील अवैध प्रवासी वाहतूक आता माफिया राज स्वरूप धारण करीत आहे. घोडबंदर मधील तरुणांवर महामार्गावर होणारे हल्ले, आणि त्यांच्या आई बहीणीवर जर गावगुंडांची वाईट नजर पडणार असेल तर युवक काँग्रेस कदापि शांत बसणार नाही. आमचा मिरा भाईंदर पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. आयुक्त श्री सदानंद दाते यांनी सदर विषयात तातडीने लक्ष वेधून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत आहोत! – दीप काकडे (युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी)