संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
पावसांच्या धारात, वाद्यांच्या जल्लोषात आणि घोषणांच्या दणदणाटात भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात बुधवारी स्वागत केले. मुंबई भाजपाचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष शेलार यांचेही कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला की, मा. बावनकुळे व मा.शेलार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत भाजपा आगामी काळात मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवेल.
भाजपाचे मावळते प्रदेशाध्यक्ष व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या स्वागत समारंभास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री बबनराव लोणीकर, संभाजी पाटील निलंगेकर, हर्षवर्धन पाटील, आ. राणा जगजितसिंह, आ. नितेश राणे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. श्रीकांत भारतीय, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. उमा खापरे यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा. बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला एकविसाव्या शतकात देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला राज्यातील प्रत्येक बूथवर ५० युवा वॉरिअर्स उभे करायचे आहेत. या २५ लाख युवा वॉरिअर्सच्या जोरावर आगामी २०२४ च्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठे यश मिळवायचे आहे. आपल्याला आगामी काळात मुंबई महापालिका जिंकायची आहे. सर्व निवडणुकांमध्ये भाजप पक्षच नंबर एकचा राहील यासाठी मेहनत करायची आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या यशाची परंपरा टिकवायची आहे.
भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मा. बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले.
मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, चंद्रशेखर बावनकुळे सामान्य पार्श्वभूमीतून पुढे आले आहेत. भाजपाचा अध्यक्ष किंवा मुख्यमंत्री होण्यासाठी घराण्याची पार्श्वभूमी नव्हे तर पक्षातील मेहनत आणि गुणवत्ता आवश्यक असते. पक्षामध्ये नेतृत्वावर विश्वास ठेऊन श्रद्धेने काम करत रहावे याचे बावनकुळे हे उदाहरण आहे. मेहनत घेणारे नेतृत्व राज्याचे अध्यक्ष म्हणून मिळाले आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाने मा. आशिष शेलार यांच्यावर जबाबदारी दिली असून ते पक्ष नेतृत्वाच्या विश्वासाला पात्र ठरतील, असे मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. मुंबई महानगरपालिकेवर विजयाचा झेंडा लावल्याशिवाय थांबणार नाही, असा निर्धार मा. आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये समावेश झाल्याबद्दल मा. देवेंद्र फडणवीस यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचे मुंबई विमानतळावर कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी व मा.आशिष शेलार यांनी विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतीस्थळ, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आणि चर्चगेट येथील अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा येथे अभिवादन केले.