राज्यात १० वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर ११ वी प्रवेशाकरिता ऐच्छिक ‘सीईटी’ परीक्षा होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. यानुसार आता ११ वी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. २१ ऑगस्ट दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान ही सीईटी परीक्षा होणार आहे.
राज्यात एकाच वेळी ही परीक्षा सर्वत्र घेतली जाणार आहे, असे राज्य सरकार कडून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे १० वी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आता ‘सीईटी’ करिता तयारीला लागण्याची गरज आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता ११ वी प्रवेशासाठी ‘सीईटी’ परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी येणाऱ्या १९ जुलै दिवशी ऑनलाईन नोंदणीस सुरुवात करण्यात येणार असल्याची महत्वाची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी यावेळी दिली आहे.
११ वी प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘सीईटी’ परीक्षा ‘ओएमआर’ उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने या परीक्षा घेण्यात येणार आहेत. १९ जुलै या दिवसापासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्याकरिता ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी १० वी मधील गुणांच्या आधारे ११ वी ची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी वेगळे शुल्क घेतले जाणार नाही असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.