‘संपूर्ण स्वछता अभियान’ मिरा-भाईंदरमध्येही प्रभावीपणे राबविणार! – आमदार प्रताप सरनाईक
मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ म्हणजेच संपूर्ण स्वछतेच्या मोहिमेला मुंबईत मोठा प्रतिसाद मिळत असून ‘डीप क्लीन ड्राईव्ह’चा विस्तार करत मिरा-भाईंदर शहरात ‘मुख्यमंत्री स्वछता अभियान’ मोठ्या प्रमाणात आता राबवले जाणार आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवार ३० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता या मोहिमेचा शुभारंभ मिरा-भाईंदरमध्ये करणार आहेत.
मुंबई महानगरानंतर ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ राबविणारे मिरा-भाईंदर शहर हे दुसरे शहर ठरणार आहे. स्वच्छ व सुंदर मीरा भाईंदर करण्यासाठी व या स्वछता मोहिमेत लोक सहभाग वाढावा यासाठी स्वतः मुख्यमंत्री मीरा भाईंदरच्या रस्त्यावर उतरणार आहेत, अशी माहिती आज आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. या स्वछता मोहिमेत मिरा-भाईंदरच्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशनानुसार प्रत्येक विभागात व्यापक स्तरावर ‘संपूर्ण स्वच्छता’ (डीप क्लिनिंग) मोहीम राबविण्यात येत आहे. त्याला मुंबईत चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबईनंतर या स्वछता मोहिमेचा सर्वत्र विस्तार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईनंतर संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहीम राबविण्यास सुरुवात करणारे मिरा-भाईंदर हे दुसरे शहर ठरणार आहे. स्वच्छ, सुंदर आणि हरित शहर राहावे यासाठी ही मोहीम ३० डिसेंबर रोजी सकाळी मिरा-भाईंदरमध्ये सुरु होणार असून निरंतर चालणाऱ्या या स्वछता मोहिमेत मिरा-भाईंदर शहर स्वच्छ व सुंदर, हरित करण्यासाठी अनेक उपक्रम, मोहिमा हाती घेतल्या जातील अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.
डीप क्लीन ड्राईव्हला मुंबईत चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ही मोहीम मीरा भाईंदर शहरात राबवावी अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली व त्यांनी ती मान्य केली. ३० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाईंदरमध्ये येणार आहेत. ३० तारखेला सकाळी ९ वाजता नवघर नाका हनुमान मंदिर येथून या स्वछता मोहिमेची सुरुवात होईल. हनुमान मंदिर परिसर, येथील मार्केट व तलाव परिसरात स्वछता मोहीम सुरु होईल. त्यानंतर प्रभाग क्रमांक १२ मध्ये मुख्य रस्त्यावर स्वछता मोहिम राबवली जाणार असून त्यात स्वतः मुख्यमंत्री सहभागी होतील.
याच परिसरात आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून महापालिकेची पहिली सीबीएसई शाळा सुरु होणार असून त्या शाळा इमारतीला मुख्यमंत्री भेट देतील. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन निर्मितीचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आले असून त्या कामाची मुख्यमंत्री पाहणी करतील. आमदार सरनाईक यांच्या विशेष निधीतून मीरा भाईंदर मनपा क्षेत्रात कचरा संकलन करण्यासाठी १० घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या असून त्या गाड्यांचे लोकार्पणही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
लोक सहभाग वाढविणार! – आमदार सरनाईक
मिरा-भाईंदर हे आपले शहर आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या स्वछता मोहिमेत आपले योगदान द्यावे. याआधी मिरा-भाईंदर शहराला स्वछतेसाठी राज्य व केंद्र सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत. आता संपूर्ण स्वछता म्हणजेच डीप क्लीन ड्राईव्ह ही मोहीम मीरा भाईंदर मध्ये आणखी व्यापक प्रमाणात प्रभावीपणे राबवली जाणार असून त्यात नागरिकांनी निरंतर व अविरत सहभाग द्यावा, लोक सहभाग वाढविण्यासाठी लोकांचे प्रबोधन व विविध उपक्रम केले जातील, असे आमदार सरनाईक म्हणाले. मुंबईनंतर डीप क्लीन ड्राईव्ह राबविणारे मीरा भाईंदर हे दुसरे शहर असून मुख्यमंत्र्यांचे मीरा भाईंदर शहरावर विशेष प्रेम व लक्ष आहे असेही आमदार सरनाईक यांनी आवर्जून नमूद केले.
आमदार सरनाईक व आयुक्त यांच्यात आज या स्वछता मोहिमेच्या आयोजनाबाबत सविस्तर बैठक झाली. त्यानंतर महापालिका आयुक्त संजय काटकर म्हणाले की, डीप क्लीन ड्राईव्ह अंतर्गत ६८ प्रकारची विविध कामे आम्ही करणार आहोत. शहरातील नागरिकांचे राहणीमान सुधारावे, शहर अधिक स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील. डीप क्लीन ड्राईव्ह म्हणजेच संपूर्ण स्वछता मोहीम मिरा-भाईंदर शहरात राबवावी अशी आमदार सरनाईक यांची विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. मुख्यमंत्र्यांच्या आदेश व सुचने नुसार ही स्वछता मोहीम पुढील ३ महिन्यात आणखी प्रभावीपणे राबवून यशस्वी केली जाईल. स्वछता ही निरंतर व नियमीत चालणारी प्रकिया आहे. पालिका प्रशासन काम करत आहे.
डीप क्लीन ड्राईव्ह राबविण्यास सुरुवात करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सरनाईक यांची साथ व महत्वाच्या सूचना आहेत. आता नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वछ्तेबाबत जाणीव व जागरूकता निर्माण करून , प्रबोधन करण्यासही पालिका तितकेच प्राधान्य देईल. स्वछता मोहिमेत प्रबोधन आणि लोक सहभाग यावर आम्ही भर देणार आहोत. पुढील ३ महिन्यात स्वछतेच्या कामाला आणखी गती येईल. मिरा-भाईंदर शहरात ८८ बागा अधिक चांगल्या करत आहोत. नागरिकांना राहण्यासाठी शहर कसे अधिक चांगले होईल यासाठी एकत्रितपणे चांगले प्रयत्न सुरू आहेत असे आमदार सरनाईक व आयुक्तांनी सांगितले.
नागरिकांमध्ये जागृती निर्माण करून शहर कायम स्वच्छ ठेवणे हा उद्देश आहे , तंत्रज्ञानाची मदत हि स्वछता मोहिमेसाठी घेतली जाईल. पुढील 3 महिन्यात 100 टक्के कचरा वर्गीकरण प्रत्यक्षात व्हायला हवे असे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. बायोगॅस प्लांटही तयार करत आहोत. रस्त्यावर धुळीचा त्रास होतोय तो कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असेही आयुक्तांनी सांगितले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी संपूर्ण आराखडा बनवला आहे अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.