मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : मिरा- भाईंदर शहरामध्ये भराव माफियांनी धुमाकूळ घातला असून राजरोसपणे सीआरझेड, कांदळवन, नैसर्गिक पाणथळ व ना-विकास क्षेत्रात देखील भराव सुरु आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होऊन शहर बुडण्याचा धोका वाढला असताना महापालिका, पोलिसांसह राजकारणी नगरसेवक आणि महसूल विभागा कडून मात्र ह्या गंभीर प्रश्नी अर्थपूर्ण रित्या डोळेझाक सुरु आहे.
महापालिकेचे रस्ते – पदपथ व अन्य बांधकाम नव्याने करताना ते तोडल्यावर डेब्रिस मोठ्या प्रमाणात निघते. तसेच जुन्या इमारती पाडून तसेच घर वा वाणिज्य बांधकाम दुरुस्ती मधून डेब्रिस निघते. इमारतीचे पायलिंग व खोदकाम, मेट्रोचे खोदकाम आदी मधून माती – दगड आदी मोठ्या प्रमाणात निघत आहे. शिवाय मुंबईतून भरणीसाठी येणारे डंपर सुद्धा मोठ्या संख्येने आहेत.
कांदळवना सह नैसर्गिक पर्यावरण, पाणथळ, सीआरझेड व नाविकास क्षेत्र आदी संवेदनशील क्षेत्राचे संरक्षण करण्याची जबाबदारी महापालिकेसह नगरसेवक, पोलीस, महसूल, वन विभाग आदींची आहे. तसे असताना शहरात राजरोसपणे डेब्रिस आणि माती- दगड आदींची भरणी ह्या संरक्षित क्षेत्रात सुरु आहे. ह्यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहेच शिवाय पावसाळ्यात नैसर्गिक पाणी साठवून ठेवणारे हे पाणवठे नष्ट होऊन पुराचा धोका वाढत आहे.
महापालिकेने तर भराव रोखण्यासाठी पथके नेमली असून स्वच्छता निरीक्षक , कनिष्ठ अभियंता आणि प्रभाग अधिकारी आदींना भराव रोखण्याची जबाबदारी दिलेली आहे. परंतु माती भराव विरोधी पथके आणि संबंधित अधिकारी वर्ग मात्र जाणीवपूर्वक ह्या बेकायदा भरावां कडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे जो पर्यंत कोणी नागरिक तक्रार करत नाहीत तो पर्यंत राजरोस भराव सुरूच असतात. त्यातच कंस्ट्रक्शन वेस्ट मॅनेजमेंट कायद्या नुसार डेब्रिसचा बेकायदा भराव रोखण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु डेब्रिसची सर्रास बेकायदा वाहतूक आणि भराव केले जात असताना पालिका जबाबदारी झटकत आहे.
ह्या भराव माफियांना पोलिसांचा असलेले वरदहस्त देखील गंभीर आहे. कारण डेब्रिस – माती आदीची वाहतूक करणारे डंपर व लहान टेम्पो हे रस्त्यांवरून उघडपणे फिरत असतात. एरव्ही सामानाच्या टेम्पो आदीं पासून नागरिकांना तपासणी साठी अडवणाऱ्या पोलिसां कडून हे भरणीचे डंपर, टेम्पो मात्र कसे दिसत नाहीत? असा सवाल जागरूक नागरिक करत आहेत. पोलिसांचे बिट मार्शल व अधिकारी नियमित गस्त घालतात पण ह्या भराव व भरणी माफियांकडे कानाडोळा करतात. वास्तविक कांदळवन समिती मध्ये पोलीस देखील असून त्यांची सुद्धा कांदळवन संरक्षणाची जबाबदारी आहे.
एरव्ही उठसुठ सोशल मीडियावर फोटोसेशन करणारे व मनासारखे झाले नाही तर तक्रारी व सभागृहात ओरडणारे पालिका पदाधिकारी, नगरसेवक तसेच राजकारणी देखील ह्या बेकायदा भरणी आणि भरणी माफियां विरुद्ध चकार शब्द काढत नाहीत. नगरसेवकांच्या प्रभागात डेब्रिस आणि मातीची भरणी चाललेली असताना सुद्धा त्या विरोधात कारवाई साठी पुढाकार घेत नाहीत. माती – दगड भरावाच्या कारवाईची जबाबदारी महसूल विभागावर मुख्यत्वे असली तरी इतक्या मोठ्या क्षेत्रासाठी केवळ चार ते पाच तलाठी कुठे पुरणार असा सवाल केला जातो. पण तलाठी – मंडळ अधिकारी स्वतःहून गस्त घालून ह्या माफियांना जरब बसवण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत.
एकूणच ह्या बेकायदेशी भराव आणि माफियांनी बिनधास्तपणे घातलेल्या धुमाकुळास नगरसेवकां पासून पालिका, पोलीस, महसूल आदी सर्वच यंत्रणांचा वरदहस्त असल्याचे नाकारता येणार नाही. भरणी करून खाजगी जमीन मालक, विकसक आदींना भूखंड तयार करून दिले जातात. खाजगीच नाही सरकारी जागेत देखील भराव मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. भराव करून अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. भराव टाकण्यासाठी वरून पैसे सुद्धा मिळतात. बक्कळ फायद्याच्या ह्या भरावाच्या बेकायदेशीर धंद्यात अनेकांचे उखळ पांढरे होत असल्यानेच ह्या माफियांवर ठोस कारवाई केली जात नसल्याचे आरोप होत आहेत. या संदर्भात परिमंडळ १ मीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही .
“नंदकिशोर देशमुख (अपर तहसीलदार) – शहरासाठी आमच्याकडे केवळ चार – पाच तलाठीच आहेत तरी तक्रारीच्या अनुषंगाने कांदळवनात भराव करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची व दंडाची कारवाई केली जाते. महापालिका आणि पोलिसांना संयुक्त बैठक बोलावून कार्यवाहीची रूपरेषा ठरवण्यात येईल .
“दिलीप ढोले (अतिरिक्त आयुक्त , महापालिका)- महापालिके कडून ह्या प्रकरणी अजिबात दुर्लक्ष केले जाणार नाही. भराव झालेल्याची माहिती तपासून त्यावर तात्काळ आवश्यक ती कारवाई केली जाईल . वॉटर बॉडीज – कांदळवन मधील भराव काढून घेतला जाईल . कांदळवन व वॉटरबॉडी शहरासाठी महत्वाच्या आहेत .