संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त ठाणेकरांचे लसीकरण करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाकडून आखले जात असले तरी लस तुटवडय़ामुळे लसीकरण मोहिमेत सातत्याने व्यत्यय येत आहे.
त्यामुळे लस तुटवडा लक्षात घेऊन उपलब्ध साठय़ातून लस वाया जाणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. महापालिका हद्दीत लस वाया जाण्याचे प्रमाण २.५१ टक्के आहे. हे राज्यातील सर्वात कमी प्रमाण असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली असली तरी येत्या काही महिन्यांत तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
यामुळे दुसऱ्या लाटेनंतर महापालिकांनी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर देण्यास सुरुवात केली असून त्यासाठी शहरात लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविली आहे.
त्या तुलनेत लशींचा पुरवठा होत नसल्यामुळे पालिकांना अनेक केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे.
लस तुटवडय़ामुळे लसीकरण मोहिमेत वारंवार व्यत्यय येत असल्यामुळे उपलब्ध साठय़ातील लशींचा पुरेपूर वापर करण्यावर पालिकांकडून भर दिला जात आहे. अशाचप्रकारे ठाणे महापालिका प्रशासनानेही लशींचे पुरेपूर वापर केला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये एकूण ५५ लसीकरण केंद्रे आहेत.
या केंद्रांवर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशी नागरिकांना देण्यात येतात.
शहरात आतापर्यंत एकूण ३,४१,९५० लशींचे डोस उपलब्ध झाले आहेत.