संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवली पूर्वेकडील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्रिमूर्तीनगरमध्ये एक घटना घडली आहे. शेजारच्या तरुणाने गुटखा खाण्यास मागितला. मात्र आपण गुटखा खात नाही, आपल्याजवळ गुटखा नाही, असे बोलताच संतप्त झालेल्या तरुणाने त्या शेजाऱ्यावर धारदार चाकूने वार करुन त्याला गंभीर जखमी करून पसार झाला आहे.
ही घटना डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोर तरुणावर गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे. अजय बलवीर बोथ (वय: २२ वर्षे) राहणार त्रिमूर्तीनगर असे फरार हल्लेखोराचे नाव आहे. तर स्वतंत्रसिंग अवदलाल सिंग (वय: ३० वर्षे) राहणार सिताबाई चाळ, त्रिमूर्तीनगर असे जखमी तक्रारदाराचे नाव आहे. जखमी स्वतंत्रसिंग त्रिमूर्तीनगर मध्ये कुटूंबासह राहून तो सुतारकाम करतो. त्यातच सोमवारी रात्री नऊ वाजता जेवण झाल्यानंतर स्वतंत्रसिंग हा आपल्या घराबाहेर फेऱ्या मारत होता. यावेळी तेथे त्याच्या शेजारीच राहणारा आरोपी अजय बोथ त्याच्यासमोर येऊन त्याने स्वतंत्रसिंग याला थांबवून तुझ्याजवळ गुटखा आहे ना, तो मला खाण्यासाठी दे, अशी मागणी केली. मात्र सिंग याने आपण गुटका खात नाही, आपल्याजवळ गुटखा नाही. गुटक्यावर राज्य शासनाची बंदी असल्याने तो कोठे मिळत नाही, असे अजयला सांगितले त्यामुळे सिंगच्या या बोलण्याचा अजयला राग आला. सिंग हा आपल्याशी खोटे बोलत आहे. त्याच्याजवळ गुटखा असूनही तो आपल्याला मुद्दाम देत नाहीत, असा गैरसमज करत अजयने स्वतः जवळील धारधार चाकूने रागाच्या भरात सिंग याला काही कळण्याच्या आतच त्याच्यावर वार केले व पसार झाला.
पोलिसांकडून फरार आरोपीचा कसून शोध सुरू
चाकू हल्ल्यात सिंग गंभीर रित्या जखमी झाला. नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. तोपर्यंत आरोपी अजय घटनास्थळावरुन पळून गेला होता. जखमी अवस्थेत सिंग यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी विविध कलमानुसार अजयवर गुन्हा दाखल करुन फरार आरोपी अजयचा कसोशीने शोध सुरू केला आहे.