Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

चार राज्यांमधील पाच पोट निवडणुकांमध्ये भाजपाचा कुठेही विजय नाही !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पश्चिम बंगालमधील आसनसोल ही लोकसभा तसेच पश्चिम बंगालमधील बालीगंगे, छत्तीसगडमधील खैरागड, बिहारमधील बोचाहान आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर या चार विधानसभा जागांचे निकाल हाती आले आहेत. १२ एप्रिल रोजी चार राज्यांतील ५ जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी मतदान करण्यात आले होते.

बंगालमधील आसनसोल लोकसभा आणि चार विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपाची निराशा झाली आहे. बिहारमधील बोचाहान मतदारसंघात आरजेडी ने दणदणीत विजय मिळवला आहे. याशिवाय छत्तीसगड आणि महाराष्ट्रात काँग्रेसचा विजय झालेला आहे. बंगालमध्येही सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने निर्णायक विजयाकडे वाटचाल केली आहे.

तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला

पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली आहे. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार तृणमूल काँग्रेस खूप पुढे आहे. आसनसोलमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार ३.७ लाख मतांनी आघाडीवर आहेत. त्याचवेळी भाजप सोडून तृणमूलमध्ये दाखल झालेले बाबुल सुप्रियो बालीगंगे विधानसभा मतदारसंघात पुढे आहेत. दुसरीकडे, शत्रुघ्न सिन्हा यांनी आसनसोल लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार अग्निमित्रा पॉल यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.

बोचन विधानसभा मतदारसंघातून आरजेडीचे अमर पासवान विजयी

बिहारमधील बोचन विधानसभा मतदारसंघातून आरजेडीचे अमर पासवान विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या बेबी कुमारी यांचा ३६,५६३ मतांनी पराभव केला. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसला फायदा झाला

खैरागड विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या यशोदा वर्मा विजयी झाल्या आहेत. २१ व्या आणि अंतिम फेरीत काँग्रेसने २० हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. भाजपाच्या कोमल जंगले यांचा काँग्रेसच्या यशोदा वर्मा यांनी पराभव केला आहे.

कोल्हापूर आघाडीचं ! जयश्री जाधवांचा मोठा विजय!

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा कौल महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांना मिळाला आहे. हा कौलही खूप चांगल्या फरकाने आहे. कोल्हापूरकरांनी काँग्रेसच्या जयश्री जाधवांना ९६ हजार २२६ मते तर भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मते दिल्याचे स्पष्ट झाले आहे. १८ हजार ६४४ मतांनी जयश्री जाधव विजय मिळविला आहे. निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, मतांच्या टक्केवारीच्या हिशेबात आघाडीला ५४ टक्क्यांपेक्षा जास्त मते तर भाजपाला ४३ टक्के मते मिळाली आहेत.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *