संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षात फूट पडली आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची ? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरी शिवसेना आमचीच असून ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह आम्हालाच मिळावं, अशी मागणी दोन्ही गटाकडून केला जात आहे. हे प्रकरण आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलं आहे.
खरी शिवसेना कुणाची ? याबाबतची कागदपत्रे सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने २३ डिसेंबरपर्यंतचा कालावधी दिला होता. ठाकरे गटाकडून जवळपास २० लाख प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाकडे जमा केली आहेत. शिंदे गटाकडून मात्र किती प्रतिज्ञापत्रे जमा केली आहेत, याबाबतची स्पष्टता नाहीये. एकंदरीत अशी स्थिती असताना निवडणूक आयागाने प्रतिज्ञापत्रे जमा करण्याची तारीख पुढे ढकलली आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरून शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली आहे. शिंदे गटाला आणखी वेळ मिळावा म्हणून निवडणूक आयोगाने ही तारीख पुढे ढकलली, असा आरोप अरविंद सावंत यांनी केला आहे. ते नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अरविंद सावंत म्हणाले, “शिवसेनेच्या प्रतिज्ञापत्राची संख्या मोठी आहे. हा आकडा २० लाखांच्या आसपास आहे. पण निवडणूक आयोग आता पळवाट काढत आहे. निवडणूक आयोगाने २३ डिसेंबर शेवटची तारीख दिली होती. पण ही तारीख पुढे ढकलण्याचं कारण काय होतं ? हे मला कळलं नाही. शिंदे गटाला वेळ देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या संस्था बरबटल्या आहेत. महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार बसलं आहे, त्याच्यावर अजूनही निर्णय दिला जात नाही. ही बाब गंभीर असून लोकशाहीसाठी धोकादायक आहे. केवळ निर्णय पुढे ढकलायचं काम सुरू आहे. कारण त्यांना नकार देता येत नाहीये आणि होकार कसा देणार ? अशी अडचण निर्माण झाली आहे. हे सगळं राजकीयदृष्ट्या सुरू आहे. उद्दिष्ट आणि कर्तव्यापासून या संस्था भरकटल्या आहेत” अशी टीकाही अरविंद सावंतांनी केली आहे.