संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
सध्या भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. पहिल्या दोन लाटांच्या तुलनेत तिसरी लाट सौम्य स्वरूपाची होती. मात्र, त्यानंतर आता कोरोनाच्या चौथ्या लाटेचं संकट देशावर घोंघावत आहे. त्यासंदर्भात आता मोदी सरकारने सावधगिरीची भूमिका घेत तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.
महत्वाचं म्हणजे ‘बुस्टर डोस’ घेणाऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कारण बूस्टर डोस संदर्भात मोदी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशात आता १८ पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना कोरोना लशीचा बुस्टर डोस म्हणजेच प्रिकॉशन डोस फ्री दिला जाणार आहे, अशी घोषणाच केंद्र सरकारने केली आहे.
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, पत्रकार तसेच ६० पेक्षा जास्त वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना सध्या भारतात मोफत बुस्टर डोस दिला जात आहे. यांना सरकारी लसीकरण केंद्रावर हे डोस उपलब्ध आहेत. तर १८-५९ वयोगटातील नागरिकांसाठी खासगी लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस दिले जात आहेत. मात्र,१८-५९ वयोगटातील नागरिकांना या बूस्टर डोससाठी पैसे मोजावे लागत होते. मात्र, आता या वयोगटातील नागरिकांनाही ‘बुस्टर डोस’ मोफत देण्यात येणार आहेत, तसा निर्णयच मोदी सरकारद्वारे जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, हा मोफत ‘बूस्टर डोस’ १५ जुलैपासून १८-५९ वयोगटातील नागरिकांना उपलब्ध होईल.
१५ जुलैपासून ७५ दिवस बुस्टर डोसची विशेष मोहीम देशभरात राबवण्यात येईल. ज्यात १८ वर्षांवरील सर्वांना खासगी लसीकरण केंद्रावर कोरोना लशीचा तिसरा म्हणजे ‘बुस्टर डोस’ दिला जाईल असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.