संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
गणपती उत्सवाच्या औचित्यावर रिलायन्स मार्टतर्फे करण्यात आलेल्या एका जाहिरातींवरून वादंग निर्माण झाला आहे. रिलायन्स मार्टकडून विविध वृत्तपत्रांमध्ये देण्यात आलेल्या जाहिरातीवर हिंदुत्त्ववादी मंडळींनी टीका करायला सुरुवात केल्याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नव्या वादाला तोंड फुटलॆ आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरच्या एका जाहिरातीत सईने टिकली न लावता गणपती बाप्पांचे स्वागत केल्याचे ज्येष्ठ लेखिका शेफाली वैद्य यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले असून त्या ट्विटसोबत #nobindinobusiness असा हॅशटॅग लावला आहे. शेफाली वैद्य यांनी या जाहिरातीवर आक्षेप घेतला असून पूर्वीचा अनुभव पाहता शेफाली वैद्य आता सई ताम्हणकरला दणका देणार का ? याची चर्चा सुरू झाली आहे.
काय आहे #nobindinobusiness प्रकरण ?
मागील वर्षी २०२१ च्या दीपावलीच्या काळात काही मोठ्या ब्रँडनी त्यांच्या जाहिरातीसाठी बिंदी न लावलेल्या मॉडेल्सचे फोटो जाहिरातीसाठी वापरले होते. त्यावर शेफाली वैद्य यांनी आक्षेप घेत हिंदू सण उत्सवांच्या जाहिरातींमध्ये वापरण्यात येणाऱ्या मॉडेल्सनी बिंदी लावलीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली होती. शेफाली वैद्य यांनी घेतलेल्या या भूमिकेला सर्व स्तरांमधून मिळणार मोठा पाठिंबा पाहता अखेर सर्व संबंधित कंपन्यांनी जुन्या जाहिराती मागे घेत बिंदी लावलेल्या नव्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्या आणि ब्रॅण्ड्सला दणका देणाऱ्या शेफाली वैद्य आता सई ताम्हणकरला देखील दणका देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.