Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश

पंतप्रधान मोदींची सर्वपक्षीय बैठकीला फक्त तीन मिनिटे उपस्थिती; विरोधकांचा संताप..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्या (सोमवार) पासून सुरू होत आहे. त्या आधीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये ठिणगी पडली आहे. सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ तीन मिनिटांसाठीच हजर राहिल्याने विरोधकांचा तीळपापड उडाला. पंतप्रधानांच्या या कृतीवर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला शेवटची तीन मिनिटे उपस्थित राहिल्याबद्दल बैठकीतच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, तृणमूल काँग्रेसचे नेते, खासदार डेरेक ओब्रायन यांनी मोदींसमोरच नाराजी व्यक्त केली. सर्व राजकीय पक्षांच्या भावना समजून घेण्यासाठी पंतप्रधानांनी या बैठकीला सुरुवातीपासूनच उपस्थित राहणे आवश्यक होते. परंतु, पंतप्रधानांनी हा पायंडा मोडला, असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे.

सरकारने पळ काढू नये
दरम्यान, देशातील कोव्हिड परिस्थिती, शेतकऱ्यांचे आंदोलन आणि वाढती महागाई या विषयांवर आपल्याला चर्चा हवी आहे, सरकारने या मुद्यांपासून पळ काढू नये, अशी भूमिका विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीत व्यक्त केली. दरम्यान या सर्वपक्षीय बैठकीला ३३ पक्षांचे ४० नेते सहभागी झाले होते. यावेळी अनेक नेत्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला सल्ले दिले. तसेच काही सूचनाही केल्या. बहुतेक सदस्यांनी कृषी कायद्यावरून सरकारला अनेक सूचना केल्याचं सूत्रांनी सांगितलं. उद्या १९ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असून १३ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात तीन अध्यादेशांसहीत २३ विधेयके मंजूर करण्यात येणार आहेत. त्यात १७ नवे विधेयक आहेत. दरम्यान, या बैठकीत सरकार प्रत्येक मुद्दयांवर चर्चा करायला तयार असल्याचं मोदींनी स्पष्ट केल्याचं सूत्रांनी सांगितले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *