संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
मेसर्स बालाजी स्टील आस्थापनासाठी बोगस पाच कंपन्याची स्थापना करुन ७५.७१ कोटींची बनावट बीले घेतल्याप्रकरणी ‘महाराष्ट्र वस्तू व सेवाकर’ विभागाने कारवाई करुन एकास अटक केली. भंवरलाल गेहलोत (४५ वर्षे) असे अटक केलेल्याचे नाव असून महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बनावट देयक देणाऱ्या करदात्यांवरील विशेष मोहिमेअंतर्गत मेसर्स. बालाजी स्टील या आस्थापनास महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने भेट दिली. त्यादरम्यान मेसर्स. बालाजी स्टीलचे पाच मोठे पुरवठादार मे. द्वारकेश ट्रेडर्स, मेसर्स. एस.के. एंटरप्रायझेस, मेसर्स. परमार एंटरप्रायझेस, मेसर्स. अलंकार ट्रेडिंग आणि मेसर्स. शुभ ट्रेडर्स हे बोगस असून गेहलोत यांनी बनावट कागदपत्रांद्वारे त्यांची नोंदणी केली असल्याचे आढळले. वरील पाच बनावट कंपन्यांकडून ११.५५ कोटींची बनावट ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ मिळवत बालाजी स्टीलने प्रत्यक्षात मालाची खरेदी न करता ७५.७१ कोटी रुपयांची केवळ देयके घेतली आहेत. असे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
श्रीमती वन्मथी सी, राज्य कर सहआयुक्त, अन्वेषण – ब, मुंबई राज्यकर उपायुक्त मनाली पोहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कर विभागाचे सहायक आयुक्त महेंद्र पवार, प्रसाद आडके, सायली धोंगडे, दिनेश भास्कर तसेच राज्य कर निरिक्षक व कर सहायक यांच्या मदतीने ही कारवाई पार पडल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.