संपादक: मोईन सय्यद/ पालघर प्रतिनिधी: प्रमोद तिवारी
मुंबई- वडोदरा या आठ पदरी द्रुतगती महामार्गासाठी पालघर जिल्ह्यात आवश्यक भुसंपादनाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.या द्रुतगती महामार्गाचे पालघर जिल्ह्यातील एकूण अंतर ७८ किमी असून यासाठी सुमारे ९०१ हेक्टर जमिनीचे संपादन करण्याचे काम सुरू असून ५१ गावातील शेतकर्यांच्या जमिनी बाधीत होणार आहेत. प्रस्तावित महामार्गाच्या भूसंपादन आणि मोबदला प्रक्रीयेसाठी पालघर आणि डहाणू प्रांत कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून या प्रक्रीयेत गरीब अशिक्षित जमीन मालकांच्या अज्ञानाचा फायदा घेत संपादीत जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी त्यांच्यासोबत दलालांच्या अनेक टोळ्या सक्रीय झाल्या असून यामध्ये राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी आणि आदीवासी संघटनांचे कार्यकर्ते यांचा देखील समावेश पाहायाला मिळत आहे.
डहाणू तालुक्यातील दाभोण येथील गट नंबर १९० मधील ३६२४६ चौ.मी.आणि गट नंबर १९१ मधील ८२५ चौमी जमीन संपादित होणार आहे. यापोटी एकूण ६ कोटी ९९ लाख ५० हजार ४४६ रुपये मोबदल्या पैकी ५० वर्षांपासून जमीन कसत असलेल्या व सध्या जमीन ताब्यात असलेल्या ४ कुटुंबांना फक्त ५६ लाख मोबदला मिळाला असून ज्यांचा या संपादित जागेशी सध्या काही संबध नाही अशा खातेदारांना उर्वरित ६ कोटी ४३ लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. त्यामुळे जमीन संपादनाचा मोबदला वाटप करताना मूळ मालकांवर मोठा अन्याय झाल्याची भावना आदिवासी समाज्यातील शेतकऱ्यानीं वेक्त केली आहे.