संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
जगभरात भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. हरित क्रांतीने भारत देशात मोठी क्रांती घडवून आणली, परंतु येथील शेतकरी आद्यपही आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करण्यात कुठेतरी मागे पडला असतानादेखील साखर उत्पादनात व निर्यातीत देशाने जगात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन’ची वार्षिक परिषद नुकतीच पार पडली यावेळी काही महत्वपूर्ण तथ्य मांडण्यात आले. प्राप्त अहवालानुसार भारताने जगाच्या तुलनेत साखर उत्पादन व निर्यातीत विक्रम कायम केला असून, साखरेच्या निर्यातीत भारताचा जगात अव्वल क्रम लागला आहे. सध्या देशातून महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक साखरेचे उत्पादन घेणारे राज्य म्हणून बाजी मारली आहे.
या परिषदेत बोलताना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली की, आता खऱ्या अर्थाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोन्याचे दिवस आले असून जगासोबत राज्यानेही साखरेच्या निर्मिती व निर्यातीत मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे या व्यवसायातून सुमारे १ लाख कोटी इतकी मोठी उलाढाल होत आहे. भारताने यंदा ११२ लाख टन साखरेची विदेशात निर्यात केली असून, यामध्ये ७५ लाख टन इतका महाराष्ट्राचा वाटा आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगली आर्थिक आवक होत असून, १७ सप्टेंबर पर्यंत ४२ हजार ६०० कोटी रुपयांचे वाटप ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
ऊस पिकाला साखरेव्यतिरिक्त अन्य जोडधंदा म्हणजे इथेनॉल व पोटॅशियमची निर्मिती हा पर्याय प्राप्त असून, इथेनॉल निर्मितीत दिवसागणिक वाढ होत असताना जणू काही साखर कारखाने इथेनॉल कारखाने म्हणून नवी ओळख कायम करत आहे. सध्या गरज आहे ती आयएसओ चे कारखाने वेगाने महाराष्ट्रात येण्याची, यामुळे ऊस पिकाला आणखी सुगीचे दिन प्राप्त होईल. महाराष्ट्रात साखर निर्मितीला चांगला वाव असून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या प्रमुख राज्यांमध्ये देखील महाराष्ट्राचा क्रम लागतो. याकरिता २० हजार कोटींची गुंतवणूक लवकरच केली जाणार आहे.
साखरेची निर्यात ही केवळ देशालाच मोठ्या प्रमाणात विदेशी चलन मिळून देत नसून देशांतर्गत शेतकऱ्यांच्या कष्टाला देखील योग्य मोबदला मिळवून देण्यात सक्षम ठरत आहे. महाराष्ट्र राज्याची घोडदौड ऊस उत्पादन व साखर निर्मितीच्या बाबतीत येत्या काळात अशीच सुरु राहली तर एक दिवस भारत जगातील साखरेचे सर्वात मोठे हब म्हणून देखील नावलौकिक प्राप्त करेल. इथेनॉल निर्मिती ही जीवाश्म इंधनाला तोडीचा पर्याय असल्याने यामुळे देशाचे विदेशावर असलेले इंधन तेलाचे अवलंबित्व देखील कमी करण्यास मदत होईल.