Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

शहराच्या रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत आयुक्तांचे आदेश!

खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे आयुक्त दिलीप ढोले यांचे अधिकाऱ्यांना निर्देश!

मिरा भाईंदर प्रतिनिधी: सोमवार 19 सप्टेंबर रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त दिलीप ढोले यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अभियंत्यांची आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस शहर अभियंता दिपक खांबित, उप अभियंता, शाखा अभियंता व सर्व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

मागील काही दिवसांपासून पाऊस नियमितपणे पडत असल्या कारणाने मिरा भाईंदर शहरातील खड्ड्यांची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचे आयुक्त दिलीप ढोले यांनी उपस्थित सर्व अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिले.

काशीमीरा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते गोल्डन नेस्ट, मॅक्सस मॉल ते सुभाषचंद्र बोस मैदान, ठाकूर मॉल ते वेस्टर्न हॉटेल, हटकेश चौक ते सगणाई माता मंदिर या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे असल्याने शहरातील नागरिकांना वाहतूकी दरम्यान त्रास होत असल्याने त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

हवामान खात्याने यंदाचा पाऊस हा जानेवारी पर्यंत सुरू राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आतापासून तातडीने संथ गतीने सुरू असलेल्या पावसातही शहरातील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर करून घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

खड्डे बुझविताना डांबराची गुणवत्ता ही उत्कृष्ट दर्जाची ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. खड्डे दुरुस्ती काम सुरू असलेल्या ठिकाणी सबंधित प्रभागाच्या अभियंत्याने त्याठिकाणी उभे राहून कामाची पाहणी करून ते काम पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शहरात ठिकठिकाणी खड्डे दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे की नाही याचा स्वतः पाहणी दौरा करणार असल्याचे आयुक्त यांनी सांगितले. शहरातील खड्डे बुझविण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा दिसून आल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी आयुक्त दिलीप ढोले यांनी सदर बैठकीत दिला आहे.

आयुक्त दिलीप ढोले यांनी पुढाकार घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अभियंत्यांची बैठक घेऊन मिरा भाईंदर शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश दिल्यामुळे येणाऱ्या काळात शहरातील नागरिकांना खड्ड्यांपासून दिलासा मिळेल असे दिसत असले तरी आयुक्तांच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन केले जाईल का? शहरातील शंभर टक्के खड्डे बुजविले जातील का? किंवा खड्डे बुजविताना कामाची गुणवत्ता राखली जाईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरले!

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *