गुन्हे जगत

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नराधम गजाआड

प्रतिनिधी: अवधुत सावंत

एका ३२ वर्षीय लिंगपिसाट नराधमाने शेजारीच राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून घरी सोडण्याच्या बहाण्याने तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

शिकवणीवरून घरी परत येत असताना घडला प्रकार…

शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडिता आपल्या कुटुंबासह राहत असून ती एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तर तिच्या शेजारीच लिंगपिसाट नराधम राहत असल्याने त्याची आधीपासूनच ओळख होती. त्यातच काल दुपारच्या सुमाराला पीडित मुलगी एका खाजगी शिकवणीतून घरी जात होती. त्यावेळी तिला रस्त्यात गाठून या नराधमाने ओळखीचा फायदा घेत, तिला दुचाकीवरून घरी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. या घटनेनंतर नराधम फरार झाला होता. तर पीडित मुलगी कशीबशी आपल्या घरी पोहोचून घरच्यांना तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगताच घरच्यांना धक्काच बसला होता. घरच्यांनी तिला घेऊन शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली व त्या लिंगपिसाट नराधमावर गुन्हा दाखल केला.

नराधमाला चार दिवसाची पोलीस कोठडी…

या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी जलदगतीने तपास करून काही तासातच त्या नराधमाला ताब्यात घेऊन त्याला अटक केली. तर कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात आरोपीला हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *