प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)
अंबरनाथ – रेल्वेत नोकरी देतो सांगून लाखोंचा चुना लावणारा रेल्वे कँटीनचा कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात बेरोजगारांना चुना लावणाऱ्या भामट्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रेल्वेत विविध पदावर नोकरी देण्याच्या बहाण्याने बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा चुना लावून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात बेरोजगारांना चुना लावणाऱ्या भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे. विशेष म्हणजे हा भामटा एका रेल्वे कँटीनमध्ये काम करणारा कर्मचारी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. कैलास राजपाल सिंग असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे .
रेल्वेचे बनावट कागदपत्र देऊन फसवणूक
बदलापूर शहरात कुमार चव्हाण हा बेरोजगार तरुण राहतो. तो गेल्या काही वर्षापसून नोकरीच्या शोधात असताना त्याची ओळख आरोपी कैलास राजपाल सिंग याच्याशी झाली होती. त्यावेळी या भामट्याने कुमारला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. आरोपी कैलास हा आयआरसीटीसीच्या चर्चगेट रेल्वे स्थानकातील एका कँटीनमध्ये काम करत होता. त्यातच या भामट्याने बनावट परीक्षा, बनावट नोकरीचे मुलाखत पत्र दिले. त्यांनतर कुमार कडून 5 लाख रुपये त्याने उकळले.
गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी फरार
भामट्याने आपली अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून त्याने त्याला बनावट नियुक्तीपत्रही दिले. मात्र, हा सगळा प्रकार बनावट असल्याचे कैलास यांच्या लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाल्याने कुमार याने पोलिसात धाव घेऊन याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांनतर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला असता आरोपी कैलाश हा प्रत्येक एक ते दोन महिन्यांनी राहण्याचा ठावठिकाणा बदलत होता.
प्रकरणात रेल्वेचे दोन अधिकारी सामील
पोलीस तपासात भामट्याच्या या प्रकरणात रेल्वेचे दोन अधिकारी सामील असल्याची खळबळजनक माहिती समोर आली. विशेष म्हणजे आरोपी कैलास सिंग हा या अधिकाऱ्यांना नवी गिऱ्हाईकं शोधून द्यायचा, हे अधिकारी बनावट लेटरहेड आणि शिक्के वापरुन फसवणूक करत असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे. आता पोलीस पथक या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या शोधात असून अशाच प्रकारे या त्रिकुटाने अनेक बेरोजगारांना गंडा घातल्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. आरोपी कैलास सिंगला विरार परिसरातून अटक करण्यात आल्याची माहिती तपास अधिकाऱ्याने दिली आहे.