Latest News कोकण

रिक्षा प्रवासी वाहतुकीला नियम तर परिवहन बसमध्ये का नाही?

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

नियम व कायदे सर्वांना समसमान असावे याचा विसर बहुदा परिवहन व्यवस्थापन, वाहतूक पोलीस व पालिका प्रशासनाला पडला आहे असे दिसून येत आहे. एकीकडे कोरोना सारख्या महाभयंकर महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेताना बेफिरपणे मुखपट्टी न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. तर रिक्षात ही फक्त दोन प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी असताना दोन पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केल्यास त्या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र परिवहन बसेस मध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी वाहतुकीस परवानगी असताना याला नियमाचे पालन न करणाऱ्या बसेस मधील प्रवासी व बसचालक व बसवाहकावर का कारवाई केली जात नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. रिक्षा प्रवासी वाहतुकीला नियम तर परिवहन बसमध्ये का नाही ? असा सवाल रिक्षाचालकांनी उपस्थित केला आहे.

कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधीतींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे सामाजिक अंतर (Social Distancing) असावे म्हणून रिक्षात फक्त दोनच प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर परिवहन बसेसमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी वाहतुकीस परवानगी आहे. रिक्षाचालकांनी नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र परिवहन बसेसमध्ये प्रवासी वाहतुकीचे नियम पाळले जात नाही. अश्या बसेस मधील बसचालक व बसवाहकावर का कारवाई केली जात नाही असा सवाल रिक्षाचालकांनीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा पडला आहे. तीन पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांना गेली अनेक दिवस वाहतूक पोलीस कारवाई करत आहेत. मात्र परिवहन बसेसकडे वाहतूक पोलीस का लक्ष देत नाही याबाबत आश्चर्य वाटत आहे. बसेस मध्ये प्रवाश्यांची गर्दी पाहून या गर्दीत कोरोना चिरडून मेला, आता कोरोनां पसरत नाही का ? अश्या शब्दात प्रशासनाची नागरीकांकडून खिल्ली उडवली जात आहेत. तर खाजगी बसेस मध्येही नियमाचे पालन होत नसताना दिसते.

प्रतिक्रिया

डोंबिवली वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने परिवहन व्यवस्थापनाला पत्र दिले आहे. परिवहन बसेसमध्ये जास्त गर्दी झाल्यास बसचालक आणि बसवाहकांवर कारवाई केली जाईल. तरी प्रवाश्यांनी सोशल डिस्टनसिंग ची काळजी घेत नियमाचे पालन केले पाहिजे.
राजश्री शिंदे
सहाय्यक पोलीस निरीक्षक (वाहतूक शाखा)

परिवहन बसेसमध्ये जास्त गर्दी होणार नाही याकडे लक्ष द्यावे असे निर्देश दिले आहेत. मात्र रिक्षाचे भाडे परवडत नसल्याने नागरिकही बसमध्ये प्रवास करतात.आता प्रत्येक बसमध्ये दोन बसवाहक देणार असून यातील एक बसवाहक बसमध्ये नियमाप्रमाणे प्रवासी बसवतील.
मनोज चौधरी
परिवहन समिती सभापती

सामान्य नागरिकांवर प्रशासन नियम लादते, परंतु सोयी देत नाहीत. बसेस जास्त नसल्याने गर्दीत होणारच. आता परिस्थिती अशी आहे कि बसमध्ये गर्दी तर रिक्षात जास्तीचे भाडे आकारले जाते. रोजीरोटी कमवणाऱ्या लोकांना घराबाहेर पडावेच लागते. म्हणूनच बस ची संख्या कमी आणि सेवा नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकतर सेवा नाही त्यात सामान्यांसाठी नियम पण सोयी नाही असे सरकारचे नियम आहेत का ?
सचिन गवळी
पाम संघटना पदाधिकारी

परिवहन बसेसमध्ये नियमांचे पालन करून गर्दी करू नये असे रिक्षा युनियनने वाहतूक पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार वाहतूक पोलीस यात लक्ष घालून वेळप्रसंगी कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.
काळू कोमास्कर
लाल बावटा रिक्षाचालक – मालक संघटना (अध्यक्ष)

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *