संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णांची संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्यातच रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, अकोल्यातील सेवाभावी दत्त मेडिकलने गेल्या महिनाभरापासून एक वेगळा सेवाभाव जपला आहे. हे मेडिकल रेमडीसीवीर इंजेक्शन ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर रुग्णांना देत आहे. त्यामुळेच एकीकडे इतर ठिकाणी काळ्या बाजारात ४० ते ५० हजारांपर्यंत विकलं जाणारं हे इंजेक्शन अकोल्यात मूळ १४७५ रुपये दरात मिळत आहे.शहरातील सिव्हिल लाईन्स चौकातील दत्त मेडिकलची ओळख सेवाभावी मेडिकल अशी आहे.
महिनाभरापूर्वी मेडिकलचे संस्थापक संचालक प्रकाश सावला यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल होते. यावेळी त्यांनी रुग्णालयांकडून रेमडीसीवीर इंजेक्शनच्या माध्यमातून रुग्णांची होत असलेली लूट पाहिली. अणि त्यामधूनच ‘ना नफा, ना तोटा’ तत्वावर रेमडेसिवीर इंजेक्शन महिनाभरापासून ग्राहकांना द्यायला सुरुवात केली. त्यांच्या या उपक्रमाचं जिल्हा प्रशासन आणि मंत्रालय पातळीवर कौतुक झालं आहे.सध्या रेमडीसीवीरचा होत असलेला काळाबाजार पाहता अगदी परवडणाऱ्या भावात इंजेक्शन मिळत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनाही दिलासा मिळाला आहे.
अकोल्यातील कोरोना रुग्णांची सद्यस्थिती : एकूण पॉझिटिव्ह अहवाल – ३१०१५ – मृत – ५१३ डिस्चार्ज – २५४१० – दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) – ४०९२
सध्या कोरोनाच्या या संकटकाळातही अनेकजण माणुसकी हरवताना दिसत आहेत. मात्र, अकोल्यातील दत्त मेडिकलने दिलेला हा माणुसकीचा परिचय निश्चित राज्यातील इतर मेडिकल चालकांनी आत्मसात करणं गरजेचं आहे.