संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
बृहन्मुंबईतील ‘टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय’ आणि ‘बी.वाय.एल.नायर रुग्णालय’ ही शंभर वर्षांची तरुण संस्था असून आधुनिकतेचा साज घेत काळाप्रमाणे बदलणाऱ्या या संस्थेला राज्य सरकारच्या वतीने १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय’ आणि बी.वाय.एल.नायर रुग्णालयाचा शतकपूर्तीवर्ष सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, आमदार यामिनी जाधव, उपमहापौर सुहास वाडकर, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, जनतेला दीर्घायुष्य देणारी संस्था आज शतायुषी होते आहे, हे समाधान काही वेगळे असून या संस्थेचा हा प्रवास थक्क करणारा आहे. प्रतिकूल काळात जिद्द आणि चिकाटीने काय करता येऊ शकते हे या संस्थेने दाखवून दिले आहे. संस्था निर्माण केल्यावर जीव ओतून इतरांना जीवदान देण्याचे काम या रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र केले आहे. आज मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद आहेत, देव केवळ मंदिरे आणि प्रार्थनास्थळांमध्ये नाही तर डॉक्टरांच्या रुपात रुग्णांचा जीव वाचवत आहे. कोविड-१९ काळात कोरोनाचे संकट हे अनपेक्षित तितकेच अनाकलनीय होते, सुरुवातीला या संकटाची दहशत होती, मात्र आज आपण या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या, त्यामुळे राज्य सरकार, प्रशासन यांचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र, या कौतुकाचे खरे मानकरी सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले.
.
कोविडच्या अगोदर शंभर वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्ल्यूची साथ पसरली होती, आता त्याची काही माहिती उपलब्ध असेल असे वाटत नाही, मात्र यापुढे कोणताही विषाणू येईल त्यावेळी कोरोनाकाळात आपण काय केले ? काय करायला हवे ? याची अधिकृत नोंद करण्याची आवश्यकता असून ही माहिती ५०-१०० वर्षानंतरदेखील उपलब्ध होईल या दृष्टिने प्रयत्न करण्याची गरज बोलून दाखवतानाच या संस्थेला जेव्हा दोनशे वर्षे पूर्ण होतील त्यावेळी इतिहासात या रुग्णालयाच्या कार्याची निश्चितच नोंद होईल असेही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. शंभर वर्षांपूर्वी अनेक दानशूरांनी दान दिले, मदत केली म्हणून आज आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून जीवनदान मिळाले आहे. ‘टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय’ आणि बी.वाय.एल. नायर रुग्णालय या संस्थेला १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करतानाच शंभर वर्षांनंतरही लोकांसाठी हितकारक ठरेल असे काम करून दाखवण्याचे आवाहनही मुख्यमंत्री यांनी यावेळी केले.
२००५ च्या मुंबईतील पूरानंतर लॅप्टोस्पयरोसिस, डेंग्यूचा धोका वाढला होता त्यावेळी चाचण्या करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात पहिली लॅब सुरु झाली, नंतर कोरोनाच्या काळात चाचण्यांसाठी सुरुवातीला ‘कस्तुरबा’ आणि पुण्याची ‘एनआयव्ही’ अशा दोनच प्रयोगशाळा होत्या आज या प्रयोगशाळांची संख्या सहाशेच्या वर गेल्या असून पूर्वी सात-आठ हजार खाटांची क्षमता असलेल्या या राज्यात आता साडेचार लाख खाटा वाढल्या आहेत. कोरोनाच्या ‘डेल्टा व्हेरियंट’च्या तपासणीसाठी नायर रुग्णालयातच एकमेव ‘जिनोम सिक्वेन्सिंग लॅब’ उभारण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.
शतकपूर्तीवर्षे असलेल्या या संस्थेचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान असून ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. वैद्यकीय सेवेसाठी पुढाकार घेऊन संस्थेने केलेल्या कार्याचा पालकमंत्री असलम शेख यांनी यावेळी खासकरून गौरव केला. फ्रंटलाईन वर्कर्ससाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या भरीव उपाययोजनांची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.
नायरसारखी मुंबईतील सर्व रुग्णालये ही मुंबईकरांची हृदयस्थानं असून कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या काळात नायर रुग्णालयाने केलेल्या सेवेचा महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी गौरव केला. भविष्यातील कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी मुंबईतील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीदेखील महापौरांनी यावेळी दिली.
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इम्युनॉलॉजी, शल्यक्रिया कौशल्य आणि संगणकधारित शिक्षण या तीन प्रयोग शाळांचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागनिर्मित पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची माहिती देणाऱ्या ‘गणेशोत्सव २०२१’ या माहितीपुस्तिकेचे तसेच नायर रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचाऱी तसेच विद्यार्थ्यांना कोविड काळात आलेल्या अनुभवांचे संकलन असलेल्या पुस्तिकेचेही मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. भारतीय टपाल विभागाने नायर रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त जारी केलेल्या विशेष ‘टपाल कव्हर’चे प्रकाशन आणि संस्थेच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या भित्तीचित्राचेदेखील यावेळी अनावरण करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरातील विविध रुग्णालयांमध्ये कोविड काळात केलेल्या व्यवस्थापनाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचेही यावेळी मान्यवरांनी प्रकाशन केले. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे नायर रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त संस्थेच्या कार्याचा गौरव केला.