संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कल्याण-डोंबिवली परिसरात चालत्या वाहनातून लोकांचे मोबाईल बळजबरीने चोरून नेणाऱ्या अट्टल चोरट्याला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुफियान उर्फ सद्दो मलिक बागवान असे या अट्टल चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून ३१ मोबाईल स्मार्टफोन हस्तगत केले आहेत.
एमआयडीसीतील पिंपळेश्वर मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावरून चालत जाणाऱ्या वॉचमनचा स्मार्टफोन बाईकवर आलेल्या दोघा अनोळखी व्यक्तीने चोरून नेला होता. याप्रकरणी वॉचमनने मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांकडे कोणतीही माहिती किंवा घटनास्थळावरील कोणताही पुरावा नव्हता. त्याचदरम्यान खबऱ्यानी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडीतील साईबाबा मंदिर परिसरात राहणाऱ्या सुफियानला ताब्यात घेत केलेल्या चौकशीत त्यांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच मानपाडा पोलिसांनी त्याच्याकडून ३ लाख ४० हजारांचे ३१ स्मार्टफोन आणि मोबाईल चोरीसाठी वापरण्यात आलेली रिक्षाही जप्त केल्याची माहिती एसीपी जयराम मोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. तसेच त्याच्यावर कोळसेवाडी, डोंबिवली पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असून पोलीस तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, हवालदार राजेंद्र खिलारे, विजय कोळी, पोलीस नाईक दिपक गडगे, भारत कांदळकर, प्रविण किनरे, पवार, यल्लप्पा पाटील, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र मंझा यांनी ही दमदार कारवाई केली.