संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
भारत सरकार आणि भारत सरकारच्या ‘युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय’ आणि ‘स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया ‘च्या संयुक्त विद्यमाने ४ थी ‘खेलो इंडिया युथ गेम्स २०२१’ ही स्पर्धा पंचकुला, हरियाणा येथे ४ ते १३ जून, २०२२ या कालावधीत होणार आहे. सदर स्पर्धेत ९ ते १३ जून २०२२ या कालावधीत ताऊ देवी लाल क्रिकेट स्टेडियम, पंचकुला, हरियाणा येथे होणाऱ्या खो खो स्पर्धेसाठी लिमा लुईस यांची राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
लिमा लुईस हे आंतरराष्ट्रीय पंच असून त्यांनी अखिल गोवा खो-खो संघटना स्थापन करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. गोवा खो-खो असोशिवराशनचे ते सध्या उपाध्यक्ष असून त्यांनी चार वर्षे सेक्रेटरी म्हणून सुध्दा यशस्वी कारकीर्द केली आहे. अतिशय मनमिळवू व कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख खो-खो क्षेत्रात आहे. पहिली आशियाई अजिंक्यपद खो-खो स्पर्धा (१९९९) कोलकत्ता येथे तर दुसरी आशियाई अजिंक्यपद खो-खो स्पर्धा (२००६) ढाका, बांगलदेश येथे पार पडली या दोन्ही स्पर्धेत त्यांनी पंच म्हणून कामगिरी बजावली आहे.
लिमा लुईस हे भारतीय खो-खो पंच मंडळावर गेली वीस वर्षे काम करीत आहेत. दर चार वर्षांनी होणार्या नॅशनल गेम्स स्पर्धेत चार वेळा मुद्रास, इम्फाळ बंगळूरु व पुणे येथील स्पर्धेत पंच म्हणून काम केले आहे. विविध राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत त्यांनी कित्येक वेळा पंच व स्पर्धा पंच प्रमुख म्हणून सुध्दा काम केले आहे.
खेलो इंडिया स्पर्धेत चार पैकी गेल्या वेळी झालेल्या गोहाटी, आसाम येथे पंच व आता होत असलेल्या पंचकुला, हरियाणा येथील स्पर्धेमध्ये ते राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.
महाराष्ट्रात दिल्या जाणार्या ‘शिवछत्रपती पुरस्कर’ च्या धर्तीवर गोवा सरकारने खो-खो स्पर्धा आयोजनाचा ‘जिवबा दादा केरकर पुरस्कार’ देऊन लिमा लुईस यांचा गौरव केला आहे.