संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवली स्टेशन जवळील एस.के.पाटील चौक येथे वाहतूक पोलीस हवालदार बाळासाहेब होरे (वय ४४) हे आपले कर्तव्य बजावत असतानाच यांना एका चारचाकी गाडीने धडक देत फरफटत नेल्याची घटना बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास डोंबिवलीत घडली आहे. गाडीला काळ्या काचा आणि मोठ्याने डेक लावला असल्याने हवालदार होरे यांनी गाडी चालकाला गाडी थांबविण्याचा इशारा दिला असता त्याने गाडी न थांबवता होरे यांच्या अंगावर घातली. होरे यांनी गाडीचे बोनेट पकडले असता चालकाने त्यांना फरफटवत गाडी चिपळूणकर रोड मार्गे बालभवन पर्यंत पळवत नेली. तेथे होरे यांना गाडीवरून खाली पाडत चालकाने पुन्हा मागे गाडी वळवून तेथून पळ काढला.
दरम्यान ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून यादरम्यान कारचालकाने एका रिक्षाचालकास देखील धडक दिली असून रिक्षाचालक देखील जखमी झाला आहे. यात होरे यांच्या हाताला, पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गाडी चालकावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे व पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.