कोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे घाबरुन जाण्याची गरज नाही असं मत भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केलं आहे. सरकार सावध असल्याचंही त्यांनी सांगितलं.
युकेमध्ये कोरोना व्हायरसची नवी स्ट्रेन (प्रजात) सापडल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. या बातम्यांची दखल घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) युके सरकारसोबत याविषयी सखोल चर्चा केली.
कोरोनाच्या या नव्या प्रजातीच्या माहितीनंतर इंग्लंडवरुन येणारी सर्व विमाने रद्द करावीत आणि आलेल्या प्रवाशांना क्वारंटाइन करावे अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
कोरोना व्हायरसच्या मूळ प्रजातीपेक्षा नव्या प्रजातीचा प्रसार जास्त वेगाने होत आहे. पण ही प्रजात जास्त जीवघेणी नाही. युकेसह नेदरलँड्स, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही नवी प्रजात सापडल्याचं WHO ने बीबीसीला सांगितलं.
सध्या कोरोना व्हायरसवरच्या लशी बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत कोरोनाच्या या नव्या प्रजातीतील फरकामुळे त्याच्यावर लशीचा प्रभाव पडेल की नाही हा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.
पण कोरोनाच्या नव्या प्रजातीवर लस कशा पद्धतीने परिणाम करते, हे अद्याप स्पष्ट नाही असे असले तरी भारतातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.