संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महिला अत्याचाराची संतापजनक घटना पुण्यातील निगडीमधून समोर आली आहे. ४ तरुणांनी एका तरुणीचा पाठलाग करून तिच्या तोंडामध्ये मिरची पावडर कोंबली. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीतर तिच्या कपड्यांवर आणि गुप्तांगावर दारू ओतून ब्लेडने हातावर वार केले. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी पुण्यातील निगडी परिसरातील गंगानगर येथे दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणीच्या बहिणीने गुरुवारी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, आरोपी चेतन मारुती घाडगे सह ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी आरोपी चेतनला अटक केली आहे.
२७ वर्षीय पीडित तरुणी गुरुवारी गुरुदेवनगर येथील बेल्हेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन घरी येत होती. वाटेमध्ये ती एका फेरीवाल्याजवळ मक्याचे कणीस घेण्यासाठी थांबली होती. त्यावेळी आरोपी चेतन घाटगे आणि त्याच्या साथीदारांनी पीडितेला कोयत्याने वार करण्याची धमकी दिली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पीडित घटनास्थळावरून निघून गेली. त्यानंतर आरोपी चेतन आणि त्याच्या साथीदारांनी तिचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे ही तरुणीने जीव वाचवण्यासाठी एका शौचालयामध्ये आसरा घेतला. पण पाठलाग करणारे तरुण हे सुद्धा सार्वजनिक शौचालयामध्ये घुसले आणि पीडितेला मारहाण केली. तिच्या तोंडामध्ये मिरची पावडर कोंबली अंगावरचे कपडे फाडले आणि गुप्तांगावर दारू ओतली. एवढंच नाहीतर या नराधमांनी तिला मिरची पावडर खाऊ घातली आणि तिच्या हातावर ब्लेडने वार करून पळ काढला.
या संतापजनक घटनेनंतर पीडितेच्या बहिणीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता आरोपी चेतन घाटगेला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. या प्रकरणाचा अधिक तपास निगडी पोलीस करत आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.