संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
ठाणे येथील विवियाना मॉल मधील चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा सुरु असलेला शो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून बंद करण्यात आला होता. प्रसंगी प्रेक्षकांना जबरदस्तीने चित्रपटगृहाबाहेर हुसकावून लावण्यात आले होते. तसेच एका प्रेक्षकाला मारहाण देखील करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीतर्फे जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात चित्रपटगृहात हा सर्व प्रकार घडवून आणल्याने याप्रकरणी काल वर्तकनगर पोलीस स्टेशनकडून जितेंद्र आव्हाडांना अटक करण्यात आली होती. दरम्यान जितेंद्र आव्हाड अटक प्रकरणात मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने उडी घेत वर्तकनगर पोलीसांना पत्र लिहिले आहे. सदर पत्र तिने आपल्या वडिलांकरवी पोलीस स्थानकात पाठविले आहे.
यावेळी पत्रात केतकीने नमूद केले आहे की, पोलीसांकडून आव्हाडांवर लावण्यात आलेली कलम पुरेशी नाही कारण चित्रपटगृहात एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती तेव्हा त्याची पत्नी देखील सोबत होती आणि तिला देखील मारहाण झाली होती. त्यामुळे कलम ३५४ जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या साथीदारांवर लावण्यात यावे अशी मागणी यावेळी केतकीने केली आहे. सदर हल्ला प्रकरण हे सुनियोजित होते त्यामुळे कलम १२० (ब) देखील लावण्याची मागणी केतकीकडून करण्यात आली आहे. हे सर्व न झाल्यास आम्ही हायकोर्टात जाऊन कलम वाढविण्याची विनंती करू असा थेट इशाराच केतकीने देऊन टाकला.
केतकी चितळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा वाद तसा जुनाच आहे, यापूर्वी केतकीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली होती परिणामी तिला जेलमध्ये सुद्धा जावे लागले होते. नव्याने आता जितेंद्र आव्हाड प्रकरणी केतकीने पुन्हा एका नव्या वादात उडी घेतल्याने हे प्रकरण कुठल्या दिशेला जाते हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.