संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
गेल्या तीन महिन्यांनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले आहेत. बाहेर पडल्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय कलगीतुरा अधिकच रंगण्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच शिंदे गटात दाखल झालेले खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच असून आज सकाळी त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी महाराष्ट्रातील शिंदे सरकारला लक्ष्य केलं. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांशी शक्यताही व्यक्त केली आहे.
“गजानन किर्तीकर सोडून गेल्याचं दु:ख अधिक”
“अमोल किर्तीकर कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेसोबतच आहेत. गजानन किर्तीकरांनी घेतलेल्या निर्णयात ते सहभागी नाहीत.त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. १०० दिवसांनी तुरुंगातून सुटल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद मला अमोल आमच्यासोबत राहिल्याचा झालाय. अशाच कडवट लोकांसोबत शिवसेनेचा प्रवास पुढे जाणार आहे. आम्हाला अनेक लोक सोडून गेले. पण गजानन किर्तीकर सोडून गेल्याचं दु:ख आम्हाला जास्त आहे”, असं संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.