मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरातील उत्तन येथील मच्छीमारांसाठी समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या बोटीचे खडकावर आदळून होणारे नुकसान टाळण्यासाठी खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजनच्या उपलब्ध झालेल्या निधीतून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत दीपस्तंभाच्या कामाचे जलभूमीपूजन प्रार्थनापूर्वक खासदार राजन विचारे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यावेळी आमदार गीता जैन, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला संघटक स्नेहल सावंत, शहर प्रमुख बर्नाड डिमेलो, जयराम मेसे, पप्पू भिसे, उपशहर प्रमुख केशीनाथ पाटील, अशोक मोरे, नगरसेवक एलियस बांड्या, हेलन जॉर्जी गोविंद, शर्मिला बगाजी, स्थानिक मच्छीमार जमातीचे पाटील कलमेड गौर्या, डिक्सन डीमेकर, मॅक्सी नेतोगर, ऑस्कर ग्रेसेस, वासुदेव मयेकर, व इतर शिवसैनिक पदाधिकारी व स्थानिक मच्छिमार उपस्थित होते.
गेल्या १० वर्षापासून खुट्याची वाट या खडकावर दीपस्तंभ उभे रहावे अशी सर्व मच्छिमारांची मागणी होती. उत्तन, पाली, डोंगरी चौक तसेच इतर गावातील मच्छीमाऱ्यांचा मच्छिमारी हा पारंपारिक व्यवसाय असून छोटे मोठे मच्छिमार त्यांचा उदरनिर्वाह या मच्छीमारीवरती करतात. त्यांच्या बोटी भर समुद्रातून किनाऱ्यावर येत असताना या समुद्रातील खडकाळ भाग हा दिसून न आल्याने या खडकावर त्यांची बोट आदळून बोटीचे नुकसान व अनेक मच्छीमारांना आपले प्राण गमवावे लागले होते.
खासदार राजन विचारे यांनी सन २०१८-१९ च्या जिल्हानियोजनामध्ये ९० लाखाचा निधी उपलब्ध करून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत दीपस्तंभाच्या कामास जल भूमिपूजन करून कामास सुरुवात करून दिली.
तसेच खासदार राजन विचारे यांनी कातल्याची वाट, वाशी खडक आणि सऱ्याची वाट या तीन खडकांवर दीपस्तंभ लावण्याच्या सूचना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर या उत्तन भातोडी व पातान बंदरावर नव्याने जलभंजक (ब्रेक वॉटर) होणाऱ्या जेट्टीच्या कामाच्या स्थळाची पाहणी मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत केली व लवकरच या कामाचे भूमिपूजन संपन्न होणार आहे अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली.