संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या तीन स्वतंत्र तक्रारींवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ए.सी.बी) गोपनीय चौकशी सुरू केली आहे. चौकशीदरम्यान तक्रारीतील आरोपांत तथ्य आढळल्यास सिंग यांच्याविरोधात खुली चौकशी सुरू होऊ शकते किंवा त्यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याबद्दल गुन्हा नोंदवून तपास केला जाऊ शकेल.
पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे, सहायक निरीक्षक अनुप डांगे आणि सट्टेबाज सोनू जालान यांनी सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डांगे यांनी केलेल्या आरोपानुसार, गावदेवी पोलीस ठाण्यात असताना एका पबवर कारवाई आणि पब चालकाविरोधात गुन्हा नोंदविल्याने त्यांना निलंबित केले. निलंबन रद्द करण्यासाठी सिंग यांच्या नातेवाईकाने दोन कोटी रुपयांची मागणी केली.
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांविरोधात एका फसवणूक प्रकरणात भक्कम पुरावे असूनही सिंग यांनी ते दडपले.शिवाय ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी अनेक गैरप्रकार करून बेहिशेबी मालमत्ता जमा केली, असा आरोप घाडगे यांनी केला. त्यांच्या तक्रारीवरून सिंग यांच्यासह ३२ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. सट्टेबाज सोनू जालान याने केलेल्या आरोपानुसार, सिंग, निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवले. अटकेची भीती घालून १० कोटींच्या खंडणीची मागणी केली. त्यापैकी तीन कोटी रुपये उकळले. जालान याने वरळी येथे पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचा पुनरुच्चार केला. तसेच सट्टेबाजी प्रकरणात बॉलीवूडमधील अभिनेत्यांकडूनही सिंग आणि त्यांच्या साथीदारांनी कोटय़वधींची खंडणी उकळली, असा दावा केला आहे.