संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी महापालिका सज्ज असून कोरोना संक्रमित बालकांकरीता शाळांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करून ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ संकल्पना केडीएमसीच्या वतीने राबविण्यात येणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी महापालिका अविरत विविध उपाययोजना करीत आहेत, तथापी वैदयकीय तज्ञांच्या अंदाजानुसार कोविड-१९ ची तिसरी लाट अपेक्षित असून त्यामध्ये मुले विशेषत: लहान बालके कोरोना विषाणूमुळे संक्रमित होण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. या अनुषंगाने बालकांचे शाळेशी असलेले वेगळे नाते विचारात घेता, कोविड संक्रमित काळात त्यांचे भावनिक व मानसिक संतुलन पोषक राहण्यासाठी मुलांच्या शाळांच मुख्य भूमिका पार पाडू शकणार आहे.
त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेनुसार कोरोना संक्रमित बालकांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची आवश्यकता भासल्यास मोठया व्यक्तिंसाठी असलेल्या विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटरपेक्षा मुलांना त्यांच्या शाळेत विलगीकरण कक्ष निर्माण करुन तेथे व्यवस्था केल्यास त्यांचे मन तेथे सहज रमेल याच दृष्टीने महापालिका क्षेत्रातील कोविड-१९ संसर्गाची लागण होणा-या ८ ते १२ वयोगटातील बालकांची काळजी घेण्यासाठी आणि वैद्यकीय उपचारासाठी महापालिका कार्यक्षेत्रात महापालिकेची प्राथमिक विद्यालये आणि खाजगी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये बालकांकरीता “विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटर ” ची संकल्पना आता राबविण्यात येणार आहे.
त्यानुसार महापालिकेची सर्व प्राथमिक विद्यालये, खाजगी प्राथमिक व माध्यमिक विद्यालये यांच्या मुख्यध्यापकांकडून शाळेची संपूर्ण माहिती (मुख्यध्यापकांचे नाव, मेल आयडी, व्हॉट्सॲप क्रमांक, शाळेचा संपूर्ण पत्ता, शाळेतील मुलांची संख्या इ.) उपलब्ध करुन घेणेबाबत तसेच “बालकांकरीता विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटर “या संकल्पनेची माहिती संबधित मुख्याध्यापकास उपलब्ध करुन देणेबाबत प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग यांस कळविण्यात आले आहे.
यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापकांना, त्यांनी ” माझा विदयार्थी ,माझी जबाबदारी ” या संकल्पनेस अनुसरून राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटर मध्ये भरती होणाऱ्या मुलांच्या मनोरंजनासाठी आवश्यक उपाययोजना (वाचनालये, भिंतीवर कार्टुनची चित्रे, लहान बालकांची गाणी , बैठी सुरक्षित खेळणी इ.) करणेबाबत कळविण्यात आले आहे. या सेंटरमध्ये दाखल असलेल्या मुलांची मानसिकता व मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने सर्व प्राथमिक विद्यालयातील मुख्याध्यापकांना वेळोवेळी दुरदृश्य प्रणालीद्वारे महापालिका आयुक्त यांचेमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.