Latest News ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

मग केंद्र सरकार घोटाळा करतंय का?; उद्धव ठाकरेंचा भाजप नेत्यांना सवाल..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्राकडे माहिती मागितली तर इतका आगडोंब करण्याची गरज काय?

विधानभवनात काल जे घडलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं. ही आपली संस्कृती नाही. उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार आपण देतो. मात्र एकूण जे कामकाज चाललं आहे. हा दर्जा खालावत चालल्याचं दिसून येते. लोकप्रतिनिधींकडून जनतेची काही अपेक्षा असते. काल जे काही दृश्य पाहायला मिळालं शरमेने मान खाली जाणारं कृत्य आहे. भास्कर जाधव यांच्यासोबत जे घडलं ते ऐकल्यावर असं महाराष्ट्रात घडू शकतं यावर विश्वास बसत नाही. सत्ता एके सत्ता हाच अट्टाहास असेल तर एकूणच सगळं वाईट चाललं आहे. जबाबदार पक्षाकडून हे घडलं हे खेदजनक आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपले मौन सोडले. भाजपानं घातलेल्या गोंधळाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

विधिमंडळाच्या २ दिवसीय पावसाळी अधिवेशनाची सांगता मंगळवारी झाली. या अधिवेशनात सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. यावरून विधानसभेत भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. या निलंबनावरून राज्यभरात भाजपाने निषेध आंदोलन केले. या प्रकरणी पहिल्यांदाच मुख्यमंत्री यांनी भाष्य केले.

ओबीसी आरक्षणावर केंद्राकडे इम्पिरिकल डेटाबाबत असलेली माहिती अधिकृतपणे मागितली तरी मिळत नाही. मग विरोधी पक्षनेत्यांना माहिती कशी मिळाली? इम्पिरिकल डेटा मागवला तरी त्याचा उपयोग नाही. त्यात ८ कोटी चूका असल्याचं विरोधी पक्षाचा दावा आहे. मग हा डेटा उज्ज्वला योजनेसाठी वापरण्यात येतो. मग या योजनेत घोटाळा आहे का? चुकीची माहिती केंद्र सरकारच्या योजनेसाठी कशी वापरता? ओबीसींना न्याय देण्याची मागणी केली मग इतका आगडोंब करायची गरज का? यामागचं गौडबंगाल नक्की काय आहे? सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या त्या लांच्छनास्पद होत्या असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपाला लगावला.

ओबीसी समाजाबद्दल ठराव मांडला होता. जे काही बोलायचं ते बोलावं. वेडवाकडं करायची गरज नव्हती. सभागृहात समोर माईक असताना बेंबीच्या देठापासून ओरडायची गरज नाही. वेडवाकडं करायचं, आरडाओरडा करायचा ही लोकशाहीचं लक्षणं नाहीत. राजदंड पळवला जातो. ही पद्धत नाही. २ दिवसीय अधिवेशनात जनतेला समाधान देऊ असं काम केले आहे. अधिवेशनातील कामकाजाचा दर्जा खालावत चालला आहे. ज्यांच्याकडून हे घडलं त्यांनी लवकर सुधारावं अशी अपेक्षा करतो अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला. विरोधकांनी कितीही राजकारण केलं तरी आम्ही जनतेच्या जीवाशी खेळणार नाही. राजकारण करणार नाही. आम्ही एवढे नीच वागणार नाही, अशी तिखट प्रतिक्रियाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

बोगस लसीकरणातील दोषींवर कारवाई

लसीकरण घेतलेल्यांना कोरोना संसर्ग होत आहे. बोगस लसीकरणाबाबत जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. ज्या लोकांना बोगस लस दिली आहे. त्यांचीही तपासणी केली जाणार आहे. त्यांना काय दिलं होतं. हे तपासावं लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.

दोघांच्या मध्ये बसलोय, भाजपसोबत कसा जाऊ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जवळीक वाढली आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी मी सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या मधोमध बसलोय, असं म्हणत चर्चेत कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. याशिवाय, गेल्या २५ वर्षात एकत्र राहून जवळीक टीकली नाही, मग आता काय होणार ? असं म्हणत ठाकरेंनी भाजपासोबतच्या जवळीकीचा प्रश्न निकालात काढला.

तरच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक

सध्या कोरोनाची परिस्थिती आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही, हे मी राज्यपालांना कळवलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

विधिमंडळातील सर्व सदस्यांचे आभार

भास्कर जाधव यांच्यासोबत झालेलं वर्तन निंदनीय आहे. राज्यात असा पायंडा पडता कामा नये. असा पायंडा पडायचा नसेल तर सर्वांनी मिळून ठरवायला हवं. मात्र, दोन दिवसांत राज्याच्या हिताचं एवढं काम करणारं हे राज्यातील पहिलं सरकार आहे. या दोन दिवसांत जनतेला समाधान मिळेल असं काम सरकारनं केलंय. त्याबाबत आम्ही विधिमंडळातील सर्व सदस्यांचे आभार मानतो, तर ज्यांच्याकडून जे घडू नये ते घडलं त्यांना सुधारण्यासाठी मी शुभेच्छा देतो, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावलाय.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *