संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना ‘ईडी’ने मोठा झटका दिला आहे. भोसले यांची तब्बल ४ कोटींची संपत्ती ‘ईडी’ने जप्त केली आहे. पुण्यातील ‘अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची जागा ‘ईडी’ने जप्त केली आहे. या जमिनीची किंमत सुमारे चार कोटी रुपये एवढी आहे.
अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले हे गेल्या काही दिवसांपासून ‘ईडी’च्या रडारवर आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणी अविनाश भोसले आणि त्यांच्या मुलाची चौकशी केली गेली. अविनाश भोसलेंनी पुण्यातील एक एकर जागेवर बांधकाम केलं आहे. ती जमीन सरकारी आहे. यामुळे भोसले यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने पुणे पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला. दरम्यान, आज ईडीने अविनाश भोसले यांची चार कोटींची संपत्ती जप्त केली आहे.
‘ईडी’ने याआधी अविनाश भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ‘ईडी’ने आतापर्यंत अविनाश भोसले यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई मानली जाते. ‘फेमा’ कायद्याअंतर्गत ‘ईडी’ ने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त केली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. या संपूर्ण प्रकरणात आता ‘ईडी’ने भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
ईडीने फेमा कायद्यांतर्गत कारवाई करत भोसले यांना १ कोटी ८३ लाखांचा दंड केला होता. २००७ मध्ये अमेरिका आणि दुबई दौरा करुन भारतात येताना परकीय चलन आणि महागड्या वस्तू कस्टम ड्युटी न भरता चोरून आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. यापूर्वी सुद्धा त्यांची मुंबईत चौकशी सुरू होती.