Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

जाहिरात होर्डिंग्ज पालिकेने ताब्यात घेऊन थकबाकीदार ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: मीरा भाईंदर शहरात विविध ठिकाणी महापालिकेने जाहिरात होर्डिंग्ज उभारली आहेत, ती चालविण्यासाठी मात्र खाजगी ठेकेदारांना देत आपली जबाबदारी झटकून टाकल्याने लाखों रुपयांचा महसूल बुडाला असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केला आहे.

ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे महापालिकेचे लाखों रुपयांचे नुकसान होत असताना थकबाकी वसुलीसाठी कोणतेही प्रयत्न न करता पालिका प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे नागणे म्हणाले.

एकीकडे न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्याच्या कडेला, झाडांवर, विजेच्या खांबांवर जाहिरात करणे कायदेशीर गुन्हा आहे, महासभेत तसा ठराव संमत झाला आहे.

असे असताना देखील विनापरवानगी जाहिरातबाजी करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई पालिका प्रशासनाकडून केली जात नाही वा राजकीय दबावाखाली कार्यक्रम पार पडल्यानंतर बॅनर उतरवले जातात.

सदर होर्डिंग्ज वर ठेका पद्धतीच्या नावाखाली ठेकेदार मालकीहक्क दाखवत मनमानी कारभार करीत असल्याचे प्रकाश नागणे यांनी सांगितले.

एका विशिष्ट राजकीय पक्षाला झुकते माप देत हेच ठेकेदार पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत असल्याने त्या सर्वांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याकडील लाखोंची थकबाकी कायदेशीर मार्गाने वसूल करण्यात यावी तसेच शहरातील सर्व होर्डिंग्ज महापालिकेने ताब्यात घेऊन ठेकेदारी पद्धत बंद करावी.

शहरातील जाहिरातदारांना दिलासा देत नियमानुसार दरपत्रक ठरवून न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिकृतपणे परवानगी देण्यात यावी.

सदर कामकाज पालिका प्रशासना मार्फत करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडे केली आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *