मिरा-भाईंदर, प्रतिनिधि: पत्रकार असल्याची बतावणी करून अनधिकृत बांधकाम धारक, दुकानदार आणि बार मालक यांच्याकडून वसुली करणाऱ्यांचे पेव सध्या मिरा-भाईंदर शहरात फुटले आहे. कुठल्याही वर्तमानपत्राचे किंवा न्युज चॅनेलचे ओळखपत्र मिळवायचे आणि शहरात पत्रकार असल्याची बतावणी करून लोकांकडून वसुली करायची हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.
असाच एक प्रकार भाईंदर पश्चिमेकडील शिवसेना गल्लीत घडला असून एका घराच्या दुरुस्तीचे बांधकाम चालू असताना “आम्ही न्युज-24 चे पत्रकार आहोत तुझ्या बांधकामाची तक्रार करू” अशी भीती दाखवून परवेज खान नावाच्या व्यक्तीकडून 4000 रुपये उकळणाऱ्या दोन भामट्यां पत्रकारांना भाईंदर पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार परवेज जलील खान यांच्या घराच्या दुरुस्तीचे काम चालू होते, त्यावेळेस दोन भामट्यांनीं आपण न्युज-24 चे पत्रकार असल्याची धमकी देऊन
वीस हजाराच्या खंडणीची मागणी केली. शेवटी 4000 रुपयात तडजोड झाली असता आरोपी राहुल सिंग आणि अरविंद राजभर यांना शिवसेना गल्लीमध्ये पैसे घेताना भाईंदर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे.
अशा प्रकारे पत्रकार असल्याची बतावणी करून मिरा-भाईंदर शहरात नागरिकांना लुबाडणाऱ्या बोगस पत्रकारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही बोगस पत्रकारांना तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनीच पोसून ठेवले आहे. ते या बोगस पत्रकारांना हाताशी धरून तक्रारी करायला लावतात आणि मग त्यांना पुढे करून पैसे उकळले जातात. अशा प्रकारामुळे काही प्रामाणिक पत्रकारांना मात्र नामुष्कीला तोंड द्यावे लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मिरा-भाईंदर शहरात तर अशा खंडणीखोर बोगस पत्रकारांची संख्या खूपच वाढलेली दिसत आहे. तर काही जण मुंबई, वसई-विरार सारख्या बाहेरच्या ठिकाणाहून येऊन इथे वसुली करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अशा बोगस पत्रकारांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी आता पत्रकारां कडूनच केली जात आहे.