मिरा भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासन पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धनाच्या बाबतीत नेहमीच उदासीन राहिलेले आहे. शहरातील अनेक ठिकाणी मातीचा भराव आणि डेब्रिज टाकून अनेक मोठ्या झाडांना मारून टाकले जात असून महानगर पालिकेच्या उद्यान विभागाकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
अशाच प्रकारे भाईंदर पश्चिमेकडील चंदूलाल वाडी, क्रॉस गार्डन समोर असलेल्या हजारो लोकांना ऑक्सिजनचे जीवनदान देणाऱ्या जुन्या भल्या मोठ्या उंबराच्या झाडाला त्याच्या बुंध्याशी माती आणि डेब्रिज टाकून हळूहळू मारले जात आहे.
भाईंदर पश्चिमेकडील चांदूलाल पार्क समोर क्रॉस गार्डन या ठिकाणी मुख्य रस्त्यावर उंबराचे भलेमोठे झाड आहे. शनिवारी सकाळी मोटारसायकलने या रस्त्यावरून जात असताना झाडाखाली आल्यावर या झाडाची एक मोठी फांदी तुटून पाटडिया कॉम्प्लेक्सच्या समोर असलेल्या झोपडपट्टीत राहणारे रामविलास प्रजापती (४१) यांच्या डोक्यात पडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला.
झड्याच्या बुंध्या भोवती डेब्रिसचा बेकायदेशीर भराव करून हे मजबूत असलेले उंबराचे झाड कमकुवत केले गेले आहे. झाड कमकुवत झाल्याने फांदी तुटून खालून जाणाऱ्या दोन नागरिकांवर पडली त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला अशी ही दुर्दैवी दुर्घटना घडली.
या प्रकरणी सदर जागा मालक व डेब्रिस टाकणारे यांच्यावर नागरी झाडांचे जतन अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी आता केली जात आहे.
सदर झाडा सभोवताली असलेले डेब्रिस त्वरित काढून घेऊन या झाडाला जीवनदान देण्याची गरज आहे. त्याच प्रमाणे शहरातील अन्य झाडांच्या सभोवताली अशाच प्रकारे टाकण्यात येत असलेल्या डेब्रिस, भराव काढून घेण्याची मोहीम महानगरपालिके तर्फे तातडीने हाती घेण्यात यावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून केली जात आहे जेणे करून झाडांचे संवर्धन, संरक्षण करता येईल.