मिरा भाईंदर, प्रतिनिधी: भाईंदर पूर्वेकडील नवघर गाव येथे इंदिरा नगर मध्ये काल रात्री दोन युवकांना जमावाने बेदम मारहाण केली या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री पहाटे 5 च्या सुमारास दोन युवक संशयास्पद अवस्थेत इंदिरानगर परिसरात फिरत असल्याचे दिसून आल्याने या युवकांना पाहून जमाव एकत्रित झाला आणि जमावाने या युवकांना चोर समजून मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण इतक्या अमानुषपणे करण्यात आली की त्यापैकी एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा युवक हा अत्यंत गंभीर अवस्थेत होता.
दोन युवक निपचित अवस्थेत पडलेले दिसल्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांनी नवघर पोलिस ठाण्याला कळवले असता नवघर पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी दोन्ही युवकांना रुग्णालयात दाखल केले असता त्यापैकी एका युवकाला मृत घोषित करण्यात आले तर दुसऱ्या युवकाचे उपचार भाईंदर पश्चिमेकडील टेंबा रुग्णालयात केले जात आहेत.
या प्रकरणात नवघर पोलीसांनी आता पर्यंत चार लोकांना ताब्यात घेतले असून हे दोन युवक कोण होते? ते इंदिरा नगर परिसरात का फिरत होते? त्याचा पुढील तपास नवघर पोलिसांकडून केला जात आहे.