Latest News आपलं शहर

भाईंदर उत्तन येथे मच्छीमारांसाठी भातोडी व पातान बंदरावर जलभंजक (ब्रेक वॉटर) उभारणीच्या कामाचा झाला शुभारंभ

मीरा भाईंदर, प्रतिनिधी : भाईंदर पश्चिमेकडील उत्तन येथे मच्छीमारांसाठी भातोडी व पातान बंदरावर जलभंजक (ब्रेक वॉटर) उभारणीच्या कामाचा शुभारंभ आज शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आला असून त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.

भाईंदर पश्चिमेकडील उत्तन किनारपट्टीवरील भातोडी व पातान बंदरावर जलभंजक (ब्रेकवॉटर) उभारणीच्या कामाचा शुभारंभ खासदार राजन विचारे यांच्या हस्ते आज संपन्न झाला. त्यावेळी आमदार  गीता जैन, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे,  उपजिल्हाप्रमुख संदीप पाटील, राजू भोईर, महिला संघटक स्नेहल सावंत, उपजिल्हा संघटक शुभांगी कोटीयन, गटनेते व शहर संघटक नीलम ढवण, उपशहर संघटक तेजस्वी पाटील, शहर प्रमुख बर्नाड डिमेलो, पप्पू भिसे, लक्ष्मण जंगम, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील विधानसभा क्षेत्र विक्रम प्रताप सिंग, उपशहर प्रमुख केशीनाथ पाटील, अशोक मोरे, नगरसेवक एलियस बांड्या, हेलन जॉर्जी गोविंद, शर्मिला बगाजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष प्रमोद सामंत, स्थानिक मच्छीमार जमातीचे पाटील कलमेड गौर्या, डिक्सन डीमेकर, मॅक्सी नेतोगर, ऑस्कर ग्रेसेस, वासुदेव मयेकर, व इतर शिवसैनिक पदाधिकारी व स्थानिक मच्छिमार मोठया संख्येने उपस्थित होते.

हा प्रकल्प उभा करण्यासाठी राजन विचारे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर 16 ऑक्टोंबर 2015 रोजी या उत्तन परिसरात मच्छीमारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग व मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी यांच्या समवेत पाहणी केली होती. त्यामध्ये समुद्रामधील खडकावर दिशादर्शक दिवा व उत्तन भातोडी बंदराजवळ मच्छिमारांना मूलभूत सुविधांसाठी  जलभंजक (ब्रेक वॉटर) उभारावे या दोन मच्छीमारांच्या प्रमुख मागण्या होत्या.

खासदार राजन विचारे यांनी 28 मार्च 2016 रोजी तत्कालीन महसूल व मत्स्यव्यवसाय मंत्री माननीय एकनाथ खडसे यांची भेट घेऊन या उत्तन परिसरात आत्तापर्यंत मच्छीमारांसाठी कोणतेही मोठे काम याठिकाणी करण्यात आलेले नाही. त्यासाठी या ठिकाणी जलभंजक उभारण्यासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी पत्राद्वारे त्यांनी केली होती. त्यानुसार मंत्री महोदय यांच्या आदेशानुसार सन 2016-17 राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत निधीतून तरतूद करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना दिले.

या कामाच्या निधी उपलब्धतेसाठी अंतिम मंजुरीसाठी खासदार राजन विचारे यांनी या कृषी व पणन विभागाचे सचिव आबासाहेब जराड यांची भेट घेऊन राष्ट्रीय कृषी योजने अंतर्गत निधी उपलब्ध करून 44 कोटीची प्रशासकीय मंजुरी मिळवली. त्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाकडून तांत्रिक अडचणीमुळे निविदा प्रक्रियेसाठी वेळ लागत असल्याने राजन विचारे यांनी त्यांच्यावर नाराजी दर्शवली होती.

खासदार राजन विचारे यांनी स्वतः पुढाकार घेऊन मत्सव्यवसाय विभागाकडून पुणे येथे संकल्पचित्र बनविण्यासाठी पाठविण्यात आलेल्या सी डब्ल्यू पी आर एस सेंट्रल वॉटर अंड पॉवर रिसर्च सेंटर यांच्याशी तसेच तांत्रिक मान्यतेसाठी बेंगलोर येथे सी आय सी इ एफ यांच्याकडून मान्यता मिळवण्यासाठी दिल्लीपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवला. त्यानंतर नव्याने आलेल्या  महाविकास आघाडी सरकारच्या पाठपुराव्याने सी आर झेड व एम सी झेड एम ए यांची ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडून मंजुरी मिळवली.

त्यांच्या प्रयत्नाना अखेर यश आले असून आज या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले या प्रकल्पामध्ये उत्तन भातोडी बंदर येथे 260 मी. ब्रेकवॉटर, 60 मी. X 25 मी. बोटयार्ड, पाणीपुरवठ्यासाठी 1 पंपगृह आणि 70 सौर ऊर्जेवर चालणारे दिवे आणि उत्तन पातान बंदर येथे 230 मी. ब्रेकवॉटर, 60 मी. X 25 मी. बोटयार्ड, पाणीपुरवठ्यासाठी 1 पंपगृह, सौर ऊर्जेवर चालणारे 70 दिवे लावण्यात येतील अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.

खासदार राजन विचारे यांच्या प्रदीर्घ पाठपुरावा केल्यामुळेच हे शक्य झाले आहे अशी माहिती मच्छीमार संघटनेच्या वतीने देण्यात आली व त्यांनी खासदार राजन विचारे यांचा जाहीर सत्कार या वेळी करण्यात आला.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *