Latest News आपलं शहर कोकण ताज्या महाराष्ट्र

मिरा-भाईंदर महापालिके तर्फे धर्मांच्या-समाजांच्या नावाने भवन उभारण्याच्या नावाखाली केली जात आहे जनतेची दिशाभूल?

भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर शहरात गेल्या काही काळापासून विविध धर्मियांच्या समाज भवनांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमांनी धुमाकूळ घातला आहे. दर आठवड्याला कुठल्या ना कुठल्या धर्माच्या समाज भवनांच्या भूमी पूजनाचे कार्यक्रम मिरा-भाईंदर महानगरपालिके तर्फे आयोजित केले जात आहेत. परंतु आता अशा प्रकारे शहरात उभारण्यात येणाऱ्या धार्मिक भावनांच्या निर्मितीला वादाची ठिणगी पडली आहे. माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी वीर महाराणा प्रताप यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या भवनाला तीव्र आक्षेप घेतला असून त्यांच्या म्हणण्या नुसार ज्या प्रमाणे वीर योद्धा महाराणा प्रताप यांचे महान व्यक्तिमत्व आहे त्याला अनुसरून त्यांच्या नावाने उभारण्यात येणारे भवन देखील तेव्हढेच विशाल व भव्य असायला हवे. परंतु मिरा-भाईंदर महानगरपालिके तर्फे वीर महाराणा प्रताप यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारे भवन अत्यंत कमी जागेत म्हणजेच फक्त सहाशे चौरस फुटात बांधण्यात येणार आहे. त्यामुळे वीर महाराणा प्रताप यांचा सन्मान होणार नसून उलट त्यांचा अपमानच होणार असल्याचे स्पष्ट करून नरेंद्र मेहता यांनी नेमके याच गोष्टीला आक्षेप घेत आपली तीव्र प्रतिक्रिया नोंदविली आहे.

त्यामुळे आता मिरा-भाईंदर शहरात बांधण्यात येणारे विविध धर्मियांच्या समाज भवनांचे निर्माण कार्य वादात अडकण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. या संदर्भात माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी एक पत्रकार परिषद आयोजित करून आपला आक्षेप नोंदविला आहे. याबाबत सविस्तर माहिती देताना त्यांनी स्पष्ट केले कि जिल्हाधिकारी ठाणे यांनी २५ एप्रिल २०२३ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात “मूलभूत सोइ सुविधांचा विकास” या योजने अंतर्गत एकूण बारा कोटी पन्नास लाख रुपये (१२,५०,००,०००) एव्हढा खर्च करून विविध आरक्षणातील सुविधा भूखंडामध्ये अनुक्रमे आरक्षण क्रमांक ३७०, २४८, २५४, ३२०, ३१० अशा ठिकाणी “आवश्यक वापराची इमारत बांधणे” या शीर्षकाखाली अनेक इमारती बांधल्या जाणार आहेत. त्याच बरोबर ह्या इमारतींचे बांधकाम फक्त तळ मजल्याचे आहे. महापालिके तर्फे ह्या इमारतींचे जे चित्र दाखविले जात आहे त्यामध्ये मात्र ह्या इमारती एका पेक्षा जास्त मजल्यांच्या असल्याचे दाखविण्यात येत असून त्यांचे क्षेत्रफळ जवळपास एक हजार चौरस फुट इतकेच आहे. त्यामुळे हि एक प्रकारे जनतेची फसवणूक आहे.

वीर महाराणा प्रताप यांच्या नावाने जे भवन बनविण्यात येणार आहे ते अंदाजे अडीच हजार चौरस फुटांपैकी निम्म्या जागेवर म्हणजेच बाराशे पन्नास फुटाच्या जागेत ह्या इमारतींचे बांधकाम केले जाणार असून त्यातच जर इमारतीच्या आसपास आवश्यक असलेली मोकळी जागा सोडली तर उरलेल्या फक्त सहाशे चौरस फुट जागेतच इमारत बांधावी लागणार. मग एव्हढ्या छोट्याशा जागेत जे बांधकाम केले जाईल त्या ठिकाणी कोणत्याही समाजाचे सासंकृतिक कार्यक्रम कसे करता येतील? आणि अशा प्रकारे वीर महाराणा प्रताप यांचा अपमान होणार नाही का? असा प्रश्न नरेंद्र मेहता यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम-१९४९ च्या नियमानुसार महानगरपालिकेला कोणत्याही एका विशिष्ठ धर्माकरिता अथवा समाजाकरिता एखादी वास्तू अथवा भवन निर्माण करता येत नाही किंवा कोणत्याही कायद्यात तशी तरतूद देखील नाही त्यामुळेच जिल्हाधिकारी ठाणे यांच्या आदेशात कुठल्याही धर्माचा अथवा समाजाच्या भवनांचा उल्लेख नसताना मिरा-भाईंदर महानगरपालिका मात्र त्या इमारतींचा उल्लेख उत्तर भारतीय भवन, वारकरी भवन, मराठा भवन, मैथिली भवन, बंगाली भवन अशा विविध धर्मियांच्या आणि समाजाच्या नावाने करीत आहे जे बेकायदेशीर आहे. जिल्हाधिकारी ठाणे यांनी जारी केलेल्या आदेशात कुठल्याही धर्माच्या अथवा समाजाच्या नावाचा उल्लेख नसून “आवश्यक वापराची इमारत बांधणे” असा उल्लेख आहे. त्याच प्रमाणे जरी ह्या इमारती कोणत्याही धर्माच्या-समाजाच्या नावाने बनविल्या तरी त्यांची मालकी फक्त मिरा-भाईंदर महानगरपालिकेचीच असणार आहे. त्या इमारती कोणत्याही धर्माच्या अथवा समाजाच्या समूहाला हस्तांतरित करता येणार नाहीत किंवा त्याबाबतचा कोणताही ठराव देखील महापालिका प्रशासनाने मंजूर करून घेतलेला नाही

त्यामुळे मिरा-भाईंदर महानगरपालिका तर्फे ज्या प्रमाणे या सर्व इमारतींचा उल्लेख विविध धर्माचे, समाजाचे भवन असा केला जात आहे तो बेकायदेशीर तर आहेच शिवाय महापालिकेची हि कृती धर्माच्या नावावर विविध समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारी आहे. उद्या जर त्या भवनांची इमारत बांधून तयार झाली आणि त्या इमारती त्या त्या समाजाला हस्तांतरित केल्या नाही तर शहरात एक वेगळाच धार्मिक वाद निर्माण होईल आणि भविष्यात येणारे लोकप्रतिनिधी यांना जनतेला उत्तर देणे अवघड जाईल अशी भीती माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केली आहे. त्याच बरोबर एव्हढ्या छोट्याशा इमारतींच्या बांधकामांवर देखील कोट्यवधींचा निधी खर्च केला जाणार असेल तर हा एक मोठा भ्रष्टाचार देखील आहे असा गंभीर आरोप नरेंद्र मेहता यांनी केला आहे.

अशाच प्रकारे आता येत्या रविवारी म्हणजेच १८ जून २०२३ रोजी देखील विविध मान्यवरांच्या हस्ते आरक्षण क्रमांक ३२० येथे अशाच एका इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मिरा भाईंदर महानगपालिके तर्फे आयोजित करण्यात आला आहे आणि सर्वात महत्वाची आणि गंभीर बाब म्हणजे या कार्यक्रमाच्या महापालिकेच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेवर देखील या इमारतीचा उल्लेख “बंगाली समाज भवन” असा करण्यात आलेला आहे.


अशा प्रकारे मीरा-भाईंदर शहरातील राजकारणी एका प्रकारे जनतेची दिशाभूल तर करीत आहेतच शिवाय ह्या राजकारण्यां सोबत मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले देखील शहरात धार्मिक वाद निर्माण होण्याला खतपाणी घालीत असून त्यामुळे विविध समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

या सर्व प्रकरणात माजी नरेंद्र मेहता यांनी मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे आणि महापालिका प्रशासनाने जर अशा प्रकारे जनतेची दिशाभूल करणे थांबिविले नाही तर मग मात्र महापालिका प्रशासनाच्या विरोधात जिलाधिकारी ठाणे आणि राज्य शासन यांच्याकडे देखील तक्रार करू आणि त्यानंतरही हे प्रकार थाबले नाहीत तर येणाऱ्या काळात मिरा-भाईंदर शहरात उग्र जनआंदोलन करू असा इशारा माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी दिला आहे.

मिरा-भाईंदर शहरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी शासकीय रुग्णालयांची गरज आहे, मुलांना दर्जेदार शिक्षणा करिता नवीन सुसज्जित शाळांची गरज आहे, त्याच बरोबर मुबलक पिण्याच्या पाण्याची गरज आहे अशा अनेक मूलभूत सोयी सुविधांची शहरवासीयांना गरज असताना मिरा-भाईंदर महानगरपालिका मात्र शहरात अनेक ठिकाणी धर्माच्या आणि समाजाच्या नावाने भवनं उभारण्यावर हजारों कोटी रुपये खर्च करीत आहे. मिरा-भाईंदर शहरातील एकमात्र रुग्णालय भारतरत्न स्व. पंडित भीमसेन जोशी (टेम्भा हॉस्पिटल) चालविण्याची जेव्हा पाळी आली तेव्हा हे रुग्णालय चालविण्याची आमची ऐपत नाही! असे सांगून महापालिकेने हाथ वर केले. गेल्या अनेक वर्षात मिरा-भाईंदर शहरात एकही नवीन शाळा उभारलेली नाही किंवा एकही नवीन रुग्णालय उभारलेले नाही मात्र अशा प्रकारे शहरात सुशोभीकरणावर आणि विविध धर्माच्या आणि समाजाच्या नावाने भावानं उभारण्यावर मात्र हजारों कोटी रुपये वायफळ खर्च केले जात असल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा असंतोष मतदानाच्या स्वरूपात व्यक्त केला जाईल असे बोलले जात आहे.

“मिरा-भाईंदर महानगरपालिके तर्फे कुठल्याही विशिष्ठ धर्माच्या अथवा समाजाच्या नावाने भवन निर्माण करण्यात आलेले नाही किंवा अशा प्रकारे उभारण्यात येणारे भवन कोणत्याही समाजाला हस्तांतरित करण्यात येणार नाही!- दिलीप ढोले, आयुक्त तथा प्रशासक

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *