मिरारोड, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरात नव्याने पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले असून मिरारोड पूर्वेकडील रामनगर येथील महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेले प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 06 च्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पोलीस आयुक्तांचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
त्यामुळे या ठिकाणी पूर्वी असलेले प्रभाग समिती क्रमांक 06 चे कार्यालय मिरारोड पूर्वेकडील रसाज टॉकीज येथे सय्यद नजर हुसेन भवनामध्ये सद्ध्या तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले असून पूर्वी या ठिकाणी आधी प्रभाग समिती क्रमांक 04 आणि नंतर 05 चे कार्यालय होते.
महानगपालिकेच्या या उलथापालथ कारभारामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून प्रभाग कार्यालयांच्या स्थलांतरामुळे नेमके कोणते कार्यालय कुठे आहे आणि त्यांच्या रोजच्या प्रशासकीय कामकाजासाठी कोणत्या कार्यालयाशी संपर्क साधावा ह्या संभ्रमात नागरिक पडले आहेत.
अशाच प्रकारे महानगरपालिकेत ठेवलेल्या फाईली आणि कागदपत्रांची देखील दैना उडाली असून रसाज येथील सय्यद नजर हुसैन भवनातील प्रभाग समिती क्रमांक 06 च्या कार्यालयात दुसऱ्या मजल्यावर नागकांचे दस्तऐवज अक्षरशः कचऱ्यासारखे ठेवण्यात आले आहेत.
या ठिकाणी नागरिकांच्या विवाह नोंदणीच्या फाईली, कर आकारणीच्या फाईली त्याच बरोबर इतर अनेक प्रकारच्या फाईलीचा ढिगारा साचलेला असून त्यामुळे येथे सुरक्षेचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रभाग कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्या एखाद्या नागरिकाने पेटत्या सिगारेटचे अथवा बिडीचे थोटुक या फाईली वर फेकला किंवा अपघाताने शॉर्टसर्किट झाला तर मोठी आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा हा आणखीन एक चीड आणणारा प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम-2005 नुसार प्रत्येक शासकीय कार्यालयातील दस्तऐवज व कागदपत्रे यांचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र अभिलेख कक्ष स्थापन करायचा असून त्या कार्यालयात प्रत्येक अभलेखांची वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 आणि वर्ग-4 अशी वर्गवारी निश्चित करून त्यांची योग्य ती नोंद ठेवणे बंधनकारक आहे.
या अभिलेखांपैकी जे अभिलेख नष्ट करायचे असतील त्यांची यथोचित नोंद करून नंतरच त्यांची विल्हेवाट लावली जावी असा नियम करण्यात आलेला आहे परंतु मिरा भाईंदर महानगरपालिका मात्र महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम-2005 च्या नियमांची उघड उघड पायमल्ली करीत असल्याचे दिसून येत असून नागरिकांचे शासकीय दस्तऐवज व कागदपत्रे धूळ खात पडली आहेत.
या प्रकारा बाबत अभिलेख कक्षाच्या अधिकारी प्रियंका भोसले यांच्याशी संपर्क साधला असता मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय कार्यालयातील दस्तऐवज व कागदपत्रांची वर्गवारी नुसार विभागणी त्या त्या विभागा मार्फत केली जाते आणि कोणती कागदपत्रे नष्ट करायची किंवा त्यांचे जतन करायचे हे त्या संबंधित विभागाचे अधिकारी ठरवत असतात अशी माहिती दिली आहे.
आता यानुसार असे जरी मानले की ही कागदपत्रे रद्दी आहेत तरी त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावता अशा प्रकारे अस्ताव्यस्त ढीग लावून फेकून देणे हा एक गंभीर प्रकार आहे. आता यावर महानगरपालिकेचे अधिकारी या विषयावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.