संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला होता. दुसऱ्या लाटेदरम्यान अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुडवडाही जाणवला होता. आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणूबाबतच एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान मोदी यांनी देशातील निरनिराळ्या भागांमध्ये १५०० ऑक्सिजन प्लान्ट्स उभारण्याचे आदेश दिले आहेत. तसंच लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात यावं असंही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. याशिवाय ऑक्सिजन प्लांट्सची देखरेख आणि त्यांच्या कामाबाबत रुग्णालय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यावरही मोदींनी भर दिला.
दरम्यान, या ऑक्सिजन प्लांट्ससाठी पंतप्रधान मदत निधीमधून खर्च दिला जाणार आहे. तसंच यामुळे देशात ४ लाख ऑक्सिजन बेड्स उभारण्यासही मदत मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात अशी काही लोकं असली पाहिजे ज्यांना ऑक्सिजन प्लांट्सची देखभाल आणि त्याच्या कामकाजाबद्दल प्रशिक्षण दिलं जाईल, असंही मोदी बैठकीदरम्यान म्हणाले. सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी दुसऱ्या लाटेदरम्यान हाहाकार माजला होता. याशिवाय सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून खबरदारी घेतली जात आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान मुंबई, बंगळुरू, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड्सची कमतरता जाणवली होती.
दुसऱ्या लाटेदरम्यान सरकारच्या कामाकाजावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. परंतु आता खरबदारी म्हणून सरकारनं उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. तसंच लवकरात लवकर ऑक्सिजन प्लांट्स उभारण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीदरम्यान केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना राज्य सरकारांसोबत मिळून काम करण्यास सांगितलं आहे. याशिवाय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही योग्य प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितलं आहे.