
संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कृषी विधेयकासह फोन टॅपिंगचा मुद्दाही चांगलाच गाजला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. केंद्रीय संस्था जर सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम करत असतील तर त्याचाही परामर्श, काळजी आणि त्याबाबतीतील चौकशी गृहमंत्र्यांच्या माध्यमातून व्हावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी अध्यक्षांकडे केली.
अलीकडच्या काळात वर्तमानपत्रात आणि विरोधी पक्षातील लोकांकडून ‘याला ईडी लावतो, त्याला सीबीआय लावतो’ अशी विविध विधाने ऐकायला मिळतात. त्यामुळे विधानमंडळाचा सदस्य या नात्याने मंत्री म्हणून नव्हे तर सभागृहातील अनेक सदस्यांना जर महाराष्ट्रापेक्षा वेगळी केंद्रीय एजन्सी फोन टॅपिंगवर ठेवत असेल तर आमच्या सभागृहातील सदस्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे असंही जयंत पाटील म्हणाले. गृहमंत्र्यांना विनंती आहे की, केंद्रीय एजन्सीकडून राज्यातील सभागृहातील किती सदस्यांचे फोन टॅपिंगला ठेवले आहेत, याची माहिती सभागृहात ठेवावी. या परिस्थितीत सर्व सन्माननीय सदस्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सभागृहाच्या सन्माननीय अध्यक्षांची आहे, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.
नाना पटोलेही आक्रमक
२०१६-१७ मध्ये मी खासदार असताना माझ्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत होते. अशाप्रकारे लक्ष ठेवण्याचं काहीच कारण नव्हतं. मिळालेल्या माहितीनुसार माझं नाव अमजद खान ठेवण्यात आलं होतं. केंद्रातील सध्याचे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पीएचा नंबर, खासदार संजय काकडे यांचाही फोन नंबर टॅप केला गेला. अशाप्रकारे कुणाच्या गोपनीयतेचा भंग करण्याचा अधिकार कुणालाही नाही, असं सांगत नाना पटोले सभागृहात आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
जयंत पाटील आणि नाना पटोले यांनी फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर २०१६-१७ दरम्यान झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी करुन त्यातील दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात दिली.