संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कल्याण रेल्वे स्थानकात शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आलेल्या ‘कोणार्क एक्सप्रेस’ च्या डी/२ बोगीतील एका सीट खाली सापडलेल्या बेवारस बॅगेतून २ लाख ७ हजार रुपये किंमतीचा २१ किलो अंमली पदार्थ (गांजा) कल्याण आरपीएफ च्या पोलीसांने जप्त केला आहे. हा अमली पदार्थ (गांजा) नारकोटिक्स विभागाला सुपूर्द करण्यात आला असून हा गांजा कोणी आणि कुठून आणला आहे याचा तपास कल्याण आरपीएफ पोलीसांकडून सुरू आहे.
शुक्रवारी पहाटे २ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास ‘उडीसा’ हून ‘कल्याण’ स्थानकात येत असलेल्या ‘कोणार्क एक्सप्रेस’ च्या डी/२ बोगीतील एका सीट खाली बेवारस बॅग असल्याची माहिती प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला प्राप्त झाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी आरपीएफ ला सूचना देण्यात आल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ‘कल्याण आरपीएफ’ चे स्टेशन प्रभारी भुपेंद्र सिंह आणि त्यांच्या टीमने ‘कोणार्क एक्सप्रेस’ रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकातील ७ नंबर फलाटावर दाखल होताच आरपीएफ ने सुरक्षेच्या कारणास्तव एक्स्प्रेस ची संपूर्ण बोगी रिकामी करत तपासणी सुरू केली असता सीट खाली ‘लाल रंगाची ट्रॉली बॅग’ आणि ‘काळ्या रंगाची सॅक बॅग’ आढळून आली.
आरपीएफ कल्याणचे एएसआय राजकुमार भारती यांच्यासह कल्याण स्टेशनचे आरक्षक एस एन.मुंडे यांच्या टीमने या बॅगेची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यात हिरव्या रंगाचे गवतासारखे दिसणारा २० किलो ७८० ग्राम वजनाचा अंमली पदार्थ (गांजा) असल्याचे आढळून आले ज्याची अंदाजे बाजारभाव किमंत रुपये २ लाख ७ हजार ८०० इतकी असल्याचे आरपीएफ कडून सांगण्यात आले. हा गांजा ‘नारकोटिक्स’ विभागाला सुपूर्द करण्यात आला असून हा गांजा कोणी आणि कुठून आणला आहे याचा तपास कल्याण आरपीएफ पोलीसांकडून सुरू आहे.