अवधुत सावंत, कल्याण, प्रतिनिधी : शेजारी हळदीचा समारंभ सुरू असल्याचा फायदा घेत, अनैतिक संबधातून त्या महिलेवर शेजारच्याच तरुणाने गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपीची आई त्या महिलेला बचावासाठी आली असता आरोपीने स्वतःच्या आईवरही गोळीबार केला. गोळीबारात त्या महिलेचा मृत्यू झाला. तर आरोपीची आई गंभीर जखमी झाली आहे. खळबळजनक बाब म्हणजे आरोपी स्वतःही जखमी होऊन घरावर दरोडा पडल्याचा बनाव केला आहे.
ही घटना कल्याण पश्चिमेकडील सापर्डे गावात घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. पवन म्हात्रे (वय 21 वर्षे), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचे नाव असून त्याने कलेल्या गोळीबारात एका 36 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून आरोपीची आई भारती म्हात्रे या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
हळदी सभारंभात रचला कट!
मृत महिला व आरोपी तरुण शेजारीच राहत असून या दोघांमध्ये काही महिन्यांपासून अनैतिक संबध होते. मात्र, आरोपी पवनचा संशय होता की, तिचे इतरही पुरुषांसोबत अनैतिक संबध आहेत. त्यामुळे त्याने तिचा काटा काढण्याच्या ठरवले होते. त्यातच आरोपीच्या घराशेजारी रात्री बाराच्या सुमारास हळदी समारंभ सुरू होता. त्यामुळे गावातील नागरिक या कार्यक्रमात व्यस्त होते. याच दरम्यान सुरू असलेल्या हळदी कार्यक्रमापासून काही अंतरावर असलेल्या घरात पवनने महिलेवर गोळीबार केला. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. तर आरोपीची आई गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपीने रचला होता दरोड्याचा बनाव
आरोपीने कुटूंबाबर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा बनाव करत जखमी झाल्याचे दर्शवत सोमवारी दि. २२ रोजी सकाळी रुग्णालयात आई सोबत तोही उपचार घेत होता. सुरुवातीला पोलिसांना आरोपीने दिलेल्या माहितीत घरातील दागिने अज्ञात दरोडेखोराने लुटल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी घरी तपास केला असता दागिने सुरक्षित असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांचा जखमी पवनवर संशय अधिक बळावल्याने त्याची कसून दोन तास चौकशी केल्यानंतर अखेर पोलिसांनी या गुन्ह्यांची २४ तासात उकल करत आरोपी पवनला ताब्यात घेतले. तर अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याची माहिती कल्याण पोलीस परिमंडळचे-३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली असून या हत्येमागे नेमके काय कारण होते याचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक महेंद्र चकोर करत आहेत.